तेजस मोहतुरे
भंडारा : तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे (MLA Raju Karemore) हे सध्या चर्चेत आहेत. पोलीस ठाण्यात जाऊन शिविगाळ केल्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला. तेव्हापासून ते जास्तच चर्चेत आलेत. ठाण्यात जाऊन पोलिसांनाच त्यांनी शिविगाळ केली होती. नंतर माफीही मागितली. पण, त्या प्रकरणी त्यांना जेलही हवाही खावी लागली. त्यानंतर चार दिवसांपूर्वीच ते चर्चेत आले डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला म्हणून. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कमलेश कनोजे (Kamlesh Kanoje) यांच्याकडे राजू कारेमोरे लग्नाला गेले होते. तेव्हा त्यांनी चक्क ठेका धरला. नाचायला लागले. आमदार साहेबांना नाचताना पाहून नागरिकही अवाक् झाले. चार दिवसांपूर्वीच सायंकाळी बांधकाम कंत्राटदाराला शिविगाळ केली होती. त्यावेळीही त्यांची मतदारसंघात चर्चा झाली. आणि आता एक वेगळाच व्हिडिओ व्हायरल होतोय, तो म्हणजे जीममध्ये व्यायाम ( Exercising in Gym) करतानाचा.
निमित्त ऑक्सिजन फेटनेस जीमच्या उद्धाटनाचे. मोहाडी शहरातील युवा फिटनेस ट्रेनर विनय पेशने यांनी आमदार कारेमोरे यांना उद्घाटनाला बोलावले. जीम पाहून कारेमोरे यांना राहावले नाही. त्यांनी जीमवर सराव केला. वेगवेगळ्या साहित्यावर बसून व्यायाम केला. हेही व्हायरल झाले. हे सारे करताना ते आनंदित दिसत होते. प्रसंग कोणताही असो. सुखाचा की, दुःखाचा आमदार साहेब अगदी भिडून जातात.
भंडारा जिल्ह्यात राष्ट्रवादीचे बळ वाढताना दिसत आहे. लाखनी नगरपंचायतीमध्ये यापूर्वी राष्ट्रवादीला एकही जागा मिळाली नव्हती. पण, यावेळी सतरापैकी आठ नगरसेवक राष्ट्रवादीचे निवडूण आले. त्यामुळं लाखनी नगरपंचायतमध्ये सत्ता बसण्याची शक्यता आहे. मोहाडी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सातपैकी पाच जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या. मोहाडी नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीचे संख्याबळ बऱ्यापैकी आहे. सत्तेत सहभागीही होऊ शकतात, अशी परिस्थिती आहे. राजू कारेमोरे यांच्या नेतृत्त्वात जिल्ह्यात राष्ट्रवादी पाय रोवत आहे. या जीमच्या माध्यमातून आम्ही कसा घाम गाळतो, हे तर राजू कारेमोरे यांना दाखवून द्यायचं नसेल ना.