तेजस मोहतुरे
भंडारा : जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील महालगाव/मोरगाव (Mahalgaon in Mohadi taluka) गटग्रामपंचायतच्या भोंगळ कारभाराविरोधात गावकऱ्यांनी एल्गार पुकारला. पांदण रस्ते तयार न करता पैशाची उचल (Withdrawal of money without paving roads) करणाऱ्या सरपंच व पदाधिकाऱ्यांवर कारवाई मागणी करण्यात आली आहे. शासनाने याची गंभीर दखल घेतली नाही. त्यामुळं पंचायत समितीसमोर उपोषणाचे हत्यार उगारण्याची तंबी देण्यात आली आहे. गावातील लोकांना हाताला काम मिळाले पाहिजे या दृष्टिकोणातून शासनाने प्रत्येक गावात, खेड्यात राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ( National Rural Employment Guarantee Scheme) राबविली जाते. मात्र हीच योजना गैरव्यवहाराचे कुरण ठरत आहे. स्थानिक लोक ग्रामीण रोजगार हमी योजनेचा गैरफायदा घेतात. शासनाची दिशाभूल करत आहेत. असाच काहीसा प्रकार मोहाडी तालुक्यातील महालगाव/मोरगाव येथे घडला. 10 ते 23 नोव्हेंबर 2021 या कार्यकाळात सुमारे 28 लाख रुपयाचे काम हजेरीपट एम.बी. तयार करण्यात आले.
सदर कामामध्ये 28 लाख रुपयाचे देयके तयार करून रकमेची उचल करण्यात आली. मात्र गावकऱ्यांनी या कामांची चौकशी केली असता गावात कामे झालेच नाहीत. या कामांमध्ये तुलाराम हारगुडे ते गजानन ढबालेचे शेतापर्यंत पांदणरस्ता, हिरामण चव्हाण ते यशवंत हारगुडे यांच्या शेतापर्यंत, बारापातरे ते निमजेच्या शेतापर्यंत पांदण रस्ता, बाजीराव निमकर ते अर्जुन बाळबुधे यांच्या शेतापर्यंत पांदण रस्ता व इतर पांदन रस्तांच्या कामांचा समावेश आहे. या कामावर गावातील स्थानिक लोकांना कामे मिळाले नसल्याच्या आरोप गावकऱ्यांनी केला आहे. गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, रोजगार सेवक, ग्रामसेवक, तांत्रिक अभियंता यांनी संगणमत केले.
काही लोकांना पैशाचे अमिष दाखवले. त्यांच्या खात्यावर मोठ्या प्रमाणात रक्कम टाकली. त्यांची नावं हजेरीपटावर दर्ज करण्यात आली, असा आरोप करण्यात आलाय. याशिवाय या बोगस बँक खात्यामध्ये रक्कम टाकण्यात आली. जे कामे झाले म्हणून दाखवित आहेत त्या सर्व कामाचे देयके, हजेरीपट, बँक स्टेटमेन्ट संपूर्ण कागदपत्रे तयार आहेत. पांदण रस्त्यावर मुरुमाची रॉयल्टी किती ब्रासची याची संपूर्ण माहिती देण्यात आली. मोक्यावर येऊन गावाकऱ्यासमोर पांदण रस्त्याची चौकशी करण्यात यावी, अशी गावकऱ्यांची मागणी आहे. भ्रष्टाचारी अधिकारी, पदाधिकारी यांना पदमुक्त करून अटक करण्यात यावे आदी मागण्या गावकऱ्यांनी केल्या आहे. अन्यथा महालगाव येथील गावकरी मोहाडी पंचायत समितीसमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भात श्यामू बुरडे, अमर बुरडे, श्रीकांत बाळबुदे यांनी तक्रार केली आहे.