काही काही गोष्टी घडताना त्याचे काय परिणाम होतील, त्याचा कसा अर्थ घेतला जाईल हे सांगता येत नाही.
आता हेच बघा. एक व्हिडीओ भारती पवार, प्रीतम मुंडे आणि रक्षा खसडे यांचा. हा व्हीडीओ अर्थातच लोकसभेतला
आहे. हा व्हीडीओ कालपासून व्हायरल होतोय. त्याला कारण आहे ते भारती पवार यांना मंत्रिपदाची लागलेली
लॉटरी आणि प्रीतम मुंडेंची हुकलेली संधी. भारती पवार ह्या केंद्रात आता महिला विकास आणि बाल कल्याणच्या
राज्य मंत्री आहेत.
काय आहे व्हिडीओत?
लोकसभेतल्या एका चर्चे दरम्यानचा हा व्हिडीओ आहे. अर्थातच तो जुना आहे. यात भारती पवार ह्या लोकसभेत
काही प्रश्न मांडतायत. मोदी सरकार, फडणवीसांची त्या व्हिडीओत स्तुती करतायत. त्या ज्या रांगेत उभ्या
आहेत त्यांच्या एकदम मागच्या रांगेत बीडच्या खासदार प्रीतम मुंडे आणि खा. रक्षा खडसे बसलेल्या आहेत.
जसही भारती पवारांनी फडणवीसांनी कर्जमाफी केली, त्यांचे आभार व्यक्त करायला लागल्या तसं मागे
बसलेल्या प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसेंना हसू आवरेना. प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसेंना एवढू हसू आलंय
की त्या खासदारांच्या बाकाच्या खाली तोंड लपवत हसत राहिल्या. चर्चेचं गांभीर्य लक्षात घेता त्या पुन्हा गंभीर
झाल्या. पण त्यांच्या चेहऱ्यावरचा मिश्किलपणा काही गेलेला नव्हता.
ज्यांच्यावर प्रीतम मुंडे रक्षा खडसे हसल्या त्यांना आज केंद्रीय मंत्री मंडळात स्थान मिळाले आहे.
जुनी म्हण आहे ‘गर्वाचे घरं नेहमी खाली असतात’ @rajuparulekar @sakshijoshii @ParagSMohite @mayurkamble9 pic.twitter.com/5ylOYINYxj
— Shilpa Bodkhe – प्रा.शिल्पा बोडखे (@BodkheShilpa) July 7, 2021
भारती पवार नेमकं काय म्हणाल्यात?
भारती पवार-प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसे यांचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ 42 सेकंदाचा आहे.
यात भारती पवार म्हणतात- फडणवीस साहेब यांचे कर्जमाफी केल्याबद्दल आभार मानते. महोदय सध्या
पाण्यावरून गावा गावात, तालुक्या तालुक्यात, जिल्ह्या जिल्ह्यात वाद आहेत. पुढच्या काळात याच्यावर
लक्ष देणे गरजेचे आहे. याचाच विचार करून जलशक्ती मंत्रालय उभारले, त्याबद्दल पंतप्रधान मोदी
साहेब यांचे आभार मानते. माझ्या दिंडोरी मतदारसंघातल्या गावांमध्ये 20 ते 25 दिवसांनी पाणी येतं.
त्यामुळे केंद्र सरकारने वांजूळ दमनगंगा पाणी योजना असेल तसेच मांजरपाडा 2 याच्यासारखे प्रकल्प
मार्गी लावून नाशिक जिल्ह्यासह जळगाव, नगर व मराठवाड्याला न्याय द्यावा ही विनंती करते.
व्हिडीओ का व्हायरल होतोय?
हा व्हिडीओ व्हायरल होण्यामागे सध्या कारण आहे ते भारती पवारांना लागलेली मंत्रीपदाची लॉटरी.
प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद दिलं जाईल अशी जोरदार चर्चा होती. पण प्रत्यक्षात भागवत कराड, भारती
पवार यांना केंद्रात राज्यमंत्रीपद मिळालं आहे. याच पार्श्वभूमीवर काहींनी दावा केलाय की, ज्यांच्यावर
प्रीतम मुंडे रक्षा खडसे हसल्या त्यांना आज केंद्रीय मंत्री मंडळात स्थान मिळाले आहे. जुनी म्हण आहे
‘गर्वाचे घरं नेहमी खाली असतात’
प्रीतम मुंडे-रक्षा खडसे भारती पवारांवरच हसल्या?
व्हायरल व्हिडीओत प्रीतम मुंडे, रक्षा खडसे या जरी भारती पवार बोलत असतानाच हसल्या असल्या
तरीसुद्धा त्या भारती पवारांवरच हसतायत याचा कुठलाही पुरावा नाही. प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसे
यांनीही कधी म्हटलेलं नाही की त्या भारती पवारांच्या बोलण्यावर हसलेल्या आहेत. कदाचित त्यांच्यात
दुसऱ्याच गोष्टीत एखादा विनोद झाला असेल त्यांना हसू आवरलं नसण्याची शक्यता आहे आणि
नाही सुद्धा. पण काही जण अशा व्हिडीओला गांभीर्यानं घेऊन टोमणे मारतायत. खरं तर संसदेच्या
गंभीर वातावरणात असे काही हलकेफुलके क्षण येत असतात ते पाहुण सोडून द्यावेत.