राणे समर्थक आणि ठाकरे गटातील राड्यानंतर भास्कर जाधव यांची पहिली प्रतिक्रिया

| Updated on: Feb 16, 2024 | 6:51 PM

"ते रस्त्यावरुन मुद्दाम पुढे गेले. नाचगाणी करत आले. त्यांनी हातवारे करुन मुद्दाम उचकवण्याचा प्रयत्न केला. मला हे कळल्यानंतर मी स्वत: बाहेर आलो. मी आमच्या लोकांना शांत केलं आणि परत गेलो. पण परत गेल्यानंतर मला माहिती नाही त्याचवेळेला तिकडून दगडफेक सुरु झाली. तिकडून दगडफेक सुरु होताच इकडून दगडफेक सुरु झाली", असं भास्कर जाधव यांनी सांगितलं.

राणे समर्थक आणि ठाकरे गटातील राड्यानंतर भास्कर जाधव यांची पहिली प्रतिक्रिया
bhaskar jadhav
Follow us on

रत्नागिरी | 16 फेब्रुवारी 2024 : कोकणात आज चांगलाच राजकीय शिमगा बघायला मिळाला. ठाकरे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आज मोठा राडा झाला. दोन्ही बाजूने जोरदार दगडफेक झाली. भाजप नेते निलेश राणे यांची आज ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या गुहागर मतदारसंघात सभा आयोजित करण्यात आलीय. या सभेच्या निमित्ताने ते चिपळूणमध्ये आले. यावेळी भास्कर जाधव यांच्या कार्यालयाबाहेर राणे समर्थक आणि भास्कर जाधव समर्थकांमध्ये दगडफेक झाली. अखेर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. या घटनेनंतर भास्कर जाधव यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

“भाजपचे सरचिटणीस निलेश राणे हे गुहागरमध्ये माझ्या विधानसभा मतदारसंघात सभा घ्यायला येणार अशाप्रकारची जाहीरात मोठ्या प्रमाणात झाली होती. याबाबतची जाहीरात खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल करुन लोकांना मोठ्या प्रमाणात उचकवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी माझ्या कार्यालयासमोर वेगवेगळे मोठमोठे बॅनर लावले होते. त्यामध्ये गुन्ह्याला माफी नाही. हिशोब चुकता करणार, अशाप्रकारच्या आव्हानात्मक भाषेचे बॅनर लावले होते. झेंडे लावले होते. पण चिपळूणची संस्कृती आहे की, कुणाचीही सभा असली तरी कुणाच्याही बॅनरला, झेंड्याला हात लावायचा नाही. त्याप्रमाणे आम्ही कुणीही त्यांच्या झेंड्याला हात लावला नव्हता”, असं भास्कर जाधव म्हणाले.

‘माझ्या ऑफिस आणि घरासमोर त्यांनी जाणीवपूर्वक…’

“सभा गुहागरला होती. निलेश राणे हे मुंबईतून आले. वास्तविक पाहता ते दापोली मार्गे फेरी बोटीने गुहागरला डायरेक्ट जावं आणि तिथे सभा घ्यावी, असं अपेक्षित होतं. पण ते जाणीवपूर्वक चिपळूणमध्ये आले. माझ्या ऑफिस आणि घरासमोर त्यांनी जाणीवपूर्वक स्वत:चा मोठा सत्कार करण्याचा प्लॅन करुन घेतला. मी पोलिसांना सांगितलं की, सत्कार जरुर होऊद्या. पण ऑफिसबाहेर सत्कार करताना कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी तुम्ही घ्या”, असं भास्कर जाधव यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

‘मी म्हटलं काही हरकत नाही, पण…’

“ते रेस्ट हाऊसला गेले. पोलीस म्हणाले की, पाक नाक्यावर त्यांचा सत्कार होईल. तिथे सत्कार होण्याचं कारणं असं की, त्या पाक नाक्यातूनच माझ्या घरावर जाण्याचा आणि येण्याचा रस्ता आहे. त्या रस्त्यावर त्यांनी जाणीवपूर्वक स्वागत ठेवलं. मी म्हटलं काही हरकत नाही. पण साडेतीन ते जवळपास पाच वाजेपर्यंत रस्त्यावर बाहेर आलेच नाहीत. त्यांच्या स्वागतासाठी जी क्रेन लावली होती ती नाक्यावर लावली होती. नाक्यावरुन ती क्रेन जाणीवपूर्वक माझ्या ऑफिसवर आणण्याचा प्रयत्न केला गेला. मी पोलिसांना पुन्हा बोलावलं आणि सांगितलं की, तुम्ही तिथे सत्कार करा आणि ही क्रेन ऑफिसजवळ आणू नका. पण त्यांनी जाणीवपूर्वक एक तासभर ती क्रेन तिथे उभी ठेवली”, असं भास्कर जाधव म्हणाले.

‘मी माझ्या कार्यकर्त्यांना जायला सांगितलं’

“मला कोणत्याही प्रकारचा त्रास नव्हता. दीड तास उलटून गेला होता. मला बातमी अशी आली होती की, गुहागरमध्ये सभेला माणसंच आली नव्हती. त्यामुळे पोलीस मला पुढे जाऊ देत नाही हे कारण सांगून ते परत माघारी फिरतील. मी माझ्या कार्यकर्त्यांना माईकवर जाहीरपणे सांगितलं की, हा विषय इथेच संपवा आणि घरी जा. आम्ही आपापल्या घरी निघालो. त्यावेळेला त्यांनी जाणीवपूर्वक सत्कार केला. फटाक्यांची प्रचंड आतषबाजी केली. हरकत नाही. पण माझ्या बाजूला जवळपास पाच ते दहा हजार माणसं उभी होती. त्यांच्या बाजूला शे-दोनशे सुद्धा माणसं उभी नव्हती”, अशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिली.

‘पोलिसांनी एकतर्फीच कारवाई केली’

“ते रस्त्यावरुन मुद्दाम पुढे गेले. नाचगाणी करत आले. त्यांनी हातवारे करुन मुद्दाम उचकवण्याचा प्रयत्न केला. मला हे कळल्यानंतर मी स्वत: बाहेर आलो. मी आमच्या लोकांना शांत केलं आणि परत गेलो. पण परत गेल्यानंतर मला माहिती नाही त्याचवेळेला तिकडून दगडफेक सुरु झाली. तिकडून दगडफेक सुरु होताच इकडून दगडफेक सुरु झाली. पोलिसांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे हे जर हाताळायला पाहिजे होतं, त्यांना रस्त्यावर मिरवणूक काढू द्यायला नको होती. तुम्ही व्हिडीओ दाखवा. आम्ही आमच्या आवारात होतो. त्यांनीच पहिल्यांदा दगडफेक केली. त्यानंतर आमच्याकडून दगडफेक झाली. पण पोलिसांनी एकतर्फीच कारवाई केली. आमच्याच लोकांवर लाठीचार्ज केला. आमच्या बाजूनेच अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. तुम्ही त्यांना मिरवणूक काढूच कशी दिली? हा मार्ग नव्हता”, असं भास्कर जाधव म्हणाले.