नागपूर : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला जात आहे. या ठरावावरुन महाविकास आघाडीत मतभेद असल्याची टीका केली जात असल्याने महाविकास आघाडीच अडचणीत आली आहे. यावर ठाकरे गटाचे भास्कर जाधवही संतापल्याचे दिसून आले आहे. विधानसभेच्या अध्यक्षांच्या बाबत अविश्वास ठराव दाखल केला जात असतांना विरोधी पक्षनेते अजित पवार यांना विचारात घेतले जात नसल्याची चर्चा असतांना त्यांची सही नसल्याचा सवाल भास्कर जाधव यांना विचारण्यात आला होता, त्यावर भास्कर जाधव यांनी संतापातच उत्तर देत चाळीस सदस्यांच्या सह्या असल्याचे जाहीर केले आहे. ज्यावेळेस हा अविश्वास ठराव चर्चेला जाईल तेव्हा सगळेच बोलतील, बाजू मांडतील असे सांगत भास्कर जाधव यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर अविश्वास ठराव का आणावा लागला याबाबत स्पष्ट केले आहे. विरोधकांवर कसा अन्याय केला जात आहे याचा पाढाच भास्कर जाधव यांनी वाचला आहे.
भास्कर जाधव म्हणाले की, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे निपक्षपातीपणे काम करत नाहीये, असा ठराव आणणे ही दुर्दैवाची बाब आहे.
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू देत नाही, त्यांच्यावर सर्वच जण नाराजी व्यक्त करत आहे.
राहुल नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्ष आहेत. कुठल्याही पक्षाची त्यांनी बाजू घ्यायला नको, निपक्षपातीपणे त्यांनी काम केलं पाहिजे पण ते दुर्दैवाने होत नाही असे जाधव म्हणाले.
शिंदे-फडणवीस सरकार यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षपदाची जागेवर राहुल नार्वेकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर नार्वेकर यांच्यावर सर्व सदस्यांनी कौतुकाचा वर्षाव केला होता.
राहुल नार्वेकर हे विधानपरिषदेचे सभापती रामराजेनाईक निंबाळकर यांचे जावई असल्याने त्यांचे विशेष कौतुक केले जात होते.
नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान विधानपरिषदेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबाबत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
त्यामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार जयंत पाटील यांचे निलंबन केल्याने त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.