आमदार भावना गवळी यांनी आज माजी खासदार हेमंत पाटील यांना टोला लगावला. नांदेड येथे आज मराठा – कुणबी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना आमदार भावना गवळी म्हणाल्या की, विदर्भातील मुली चांगल्या आहेत, पण एक गोष्ट मात्र तेवढीच खरी आहे, इकडचे जावई तिकडे येऊन कब्जा करतात. त्याचं काय करायचं ते सांगा? असा सवाल उपस्थित करत भावना गवळी यांनी माजी खासदार हेमंत पाटलांना टोला लगावला आहे. आमच्या पोरी इकडे दिल्या आहेत म्हणून आम्ही तुम्हाला स्वीकारतो. आम्हाला जावयाची थोडीशी जास्त सरबराई करावी लागेल, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली.
कार्यकर्ता म्हणून मी काम करते, नेता म्हणून माझ्या डोक्यात हवा गेलेली नाही. कदाचित मी सहाव्या वेळेला निवडून आली असती तर केंद्रातील कॅबिनेट मंत्री मीच असते, असं म्हणत भावना गवळी यांनी मनातील खदखद व्यक्त केली. तसेच भविष्यात राज्यात मंत्री असू शकते. काही सांगता येत नाही, असं सूचक वक्तव्य भावना गवळी यांनी केलं.
मराठा कुणबी मेळाव्यात शंकरराव चव्हाण यांना भारत मिळाला पाहिजे अशी मागणी केल्यानंतर भावना गवळी म्हणाल्या की, शंकरराव चव्हाण यांचे काम एवढं मोठ आहे, त्याची तुलना होऊ शकत नाही. भारतरत्न ही जी मागणी तुम्ही करताय ती रास्त मागणी आहे. तुम्ही जी मागणी करताय त्या मागणीला सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवण्याच काम मी करेन. मी त्यांना राखी बांधते. काही गोष्टी अशा असतात, महिला म्हणून भाऊ ऐकतात, असं भावना गवळी म्हणाल्या.
“आपण सगे-सोयरे आहोत फक्त थोडीशी दुरुस्ती करायची आहे. विदर्भातील खूप सार्या मुली मराठवाड्यात आहेत. पण आम्ही विदर्भातील लोक साधेभोळे आहोत. विदर्भातील पोरी चांगल्या आहेत हे मान्य करावे लागेल. एक गोष्ट मात्र तेवढीच खरी इकडचे जावई तिकडे येऊन कब्जा करतात, त्याचं काय करायचं ते सांगा. तरी आम्ही तुम्हाला स्वीकारतो आमचं मन मोठं आहे”, असा टोला भावना गवळी यांनी हेमंत पाटील यांना लगावला. “आमच्या पोरी इकडे दिल्या आहेत म्हणून आम्हाला जावयाची थोडी जास्त सरबराई करावी लागेल”, असंदेखील भावना गवळी म्हणाल्या.
“न्याय हक्क मागण्यांसाठी आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे. कुणबी-मराठा समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन झालं पाहिजे. पुढच्या काळात ते स्थापन होईल त्याची गॅरंटी मी घेते. मी मराठा – कुणबी समाजाच्या मागण्याच्या पाठीमागे ठामपणे राहील. मराठा – कुणबी समाज म्हणजे रत्नाची खाण आहे. मी कार्यकर्ता म्हणून काम करते नेता म्हणून माझ्या डोक्यात हवा गेली नाही, कदाचित मी सहाव्या वेळेला निवडून आले असती तर केंद्रातील कॅबिनेट मंत्री मीच असते. भविष्यात कदाचित राज्यातील असू शकते काही सांगता येत नाही. मला कुणीही किती रोखल तरी मी थांबणारी महिला नाही”, असं भावना गवळी म्हणाल्या.