मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांबाबत थोड्याच वेळात मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. अजित पवारांशी झालेल्या चर्चेनंतर परिवहन मंत्री अनिल परबांनी हे संकेत दिलेत. त्यामुेळ एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर आजच तोडगा निघण्याची शक्यता आहे. अजित पवारांसोबतच्या बैठकीनंतर शिष्टमंडळात आणखी एक बैठकही घेण्यात येत आहे. आणि त्यानंतर मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.
प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या दरबारी
दिवसभरातील बैठकसत्रानंतर प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या अंतिम मंजुरीसाठी गेला असल्याचीही माहिती सुत्रांकडून देण्यात आलीय. एसटी कर्मचारी आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर अनिल परबांनी रिलायन्स रुग्णालयात दाखल होत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री काय निर्णय घेतील याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अजित पवारांसोबतच्या बैठकीत काय चर्चा?
सह्याद्रीवरील बैठकीत पगारवाढीबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिलीय. थोड्याच वेळात परिवहन मंत्री पत्रकार परिषद घेणार असल्याचीही माहिती समोर आलीय. परब आणि एसटीच्या शिष्टमंडळातही सकारात्मक चर्चा झाली आहे.
दुपारनंतर संपाबाबत वेगवान घडामोडी
आधी एसटीच्या शिष्टमंडळासोबत बैठक झाल्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब आणि उदय सामंत यांनी अजित पवारांची भेट झाली. अजित पवारांसोबतच्या बैठकीत पगारवाढीबाबत सकारात्मक चर्चा झाली. अजित पवारांसोबतच्या चर्चेनंतर परब आणि एसटी शिष्टमंडळात आणखी एक बैठक झाली. त्यानंतर आता एसटी कर्मचाऱ्यांना आणि आंदोलकांना मोठ्या घोषणेची प्रतीक्षा लागली आहे. गेल्या 15 दिवसापासून आंदोलनाला बसलेल्या एसटी कर्मचाऱ्याच्या पदरात काय पडणार? आणि संप आजच मागे घेतला जाणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.