शिवसेना ठाकरे गटाला खिंडार; उद्धव ठाकरेंच्या शिलेदारांनी केला वेगळा गट स्थापन, उद्या शिवसेनेत प्रवेश

| Updated on: Feb 17, 2025 | 5:58 PM

मोठी बातमी समोर येत आहे, उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला असून, पक्षाला खिंडार पडलं आहे.

शिवसेना ठाकरे गटाला खिंडार; उद्धव ठाकरेंच्या शिलेदारांनी केला वेगळा गट स्थापन, उद्या शिवसेनेत प्रवेश
uddhav thackeray and eknath shinde
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. आजच शिवसेना ठाकरे गटाचे नेते जितेंद्र जनावळे यांनी पक्षाचा राजीनामा दिला असल्याची बातमी समोर आली होती. ते शिवसेना ठाकरे गटाचे विलेपार्लेचे उपविभाग प्रमुख आहेत. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाला रत्नागिरीमध्ये देखील मोठा धक्का बसला आहे. रत्नागिरी व दापोली नगर पंचायतीमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं आहे. पुढील काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात. या पार्श्वभूमीवर हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

रत्नागिरी व दापोली नगर पंचायतीमधील शिवसेना ठाकरे गटाच्या पाच नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन केला आहे. हे पाचही नगरसेवक उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीपूर्वी या नगरसेवकांनी राष्ट्रवादीतून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता विकास कामांसाठी आम्ही शिवसेनेत प्रवेश करत आहोत, असं या नगरसेवकांनी म्हटलं आहे.  विलास शिगवण, अन्वर रखांंगे, मेहबूब तळघरकर, संतोष कलकुटके, अश्विनी लांजेकर असं शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्या या नगरसेवकांचं नाव आहे. आज त्यांनी जिल्हा प्रशासनाला पत्र देत कागदपत्रांची पूर्तता केली आहे. ते उद्या राज्यमंत्री योगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

दरम्यान दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी शिवसेनेला चांगलंच सुनावलं आहे. फोडाफोडीचे राजकारण बस करा, जनतेचे प्रश्न सोडवा. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासोबत सर्वसामान्य शिवसैनिक आहेत, कितीही दबाव टाकला तरी शिवसैनिक फुटणार नाहीत. सत्तेसाठी तुम्ही फोडाफोडी केली, पुन्हा सत्तेत आलात आता जनतेचे प्रश्न सोडवा, असं कैलास पाटील यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची चर्चा देखील फेटाळून लावली आहे. दुसरीकडे आज शिवसेना ठाकरे गटाचे नेते जितेंद्र जनावळे यांनी पक्षाचा राजीनामा दिला असल्याची बातमी समोर आली आहे, ते वीस तारखेला शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.