महाराष्ट्राच्या राजकारणात आता खरी रंगत येणार आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून वरळी विधानसभा मतदारसंघातून राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे वरळी विधानसभा मतदारसंघात आता प्रचंड चुरशीची आणि तिरंगी लढत होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं या मतदारसंघाच्या निकालाकडे लक्ष असणार आहे. कारण माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र तथा ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे हे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. तथा ते या विधानसभा निवडणुकीतही ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून आज उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. या यादीत मिलिंद देवरा यांना वरळीतून उमेदवारी जाहीर करण्यात आली. मिलिंद देवरा हे बडे नेते आहेत. त्यांचं वरळीत चांगलं वर्चस्व आहे. ते काँग्रेसमध्ये असताना मुंबईत खासदार म्हणूनही निवडून आले आहेत.
दुसरीकडे मनसेकडून संदीप देशपांडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मनसे पक्षाला मराठी भाषिक जनतेकडून मोठ्या प्रमाणात मतदान केले जाऊ शकते. तर आदित्य ठाकरे यांनादेखील मोठ्या प्रमाणात मराठी भाषिक जनतेकडून मतदान होऊ शकते. पण यामुळे कदाचित मतांचं विभाजन होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे या मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत आता मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत वरळी विधानसभा मतदारसंघात अतिशय नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन वरळीचे संभाव्य उमेदवार सचिन अहिर यांनी ऐनवेळी शिवसेनेत प्रवेश केला होता. ठाकरे घराण्यातील पहिला व्यक्ती विधानसभा निवडणूक लढवणार असल्याने वरळीच्या जागेवर आदित्य ठाकरे यांची बिनविरोध निवड व्हावी, असे प्रयत्न करण्यात आले होते. त्यासाठी मनसेला देखील विनंती करण्यात आली होती. तरीही विरोधकांनी उमेदवार दिले. पण शिवसेना, भाजपकडून या मतदारसंघात जास्त ताकद आणि फिल्डिंग लावण्यात आल्याने आदित्य ठाकरे या मतदारसंघात सहज जिंकून आले होते.
यावेळची वरळी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक फार वेगळी आहे. कारण तीनही उमेदवार ताकदवान आहेत. शिवसेनेत फूट पडल्यापासून आदित्य ठाकरे यांचं एक वेगळं आक्रमक रुप महाराष्ट्रातील जनेतेने पाहिलं आहे. आदित्य ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वेळोवेळी हल्लाबोल करत आहेत. त्यांच्याकडून एकनाथ शिंदे यांना निवडणुकीत आपल्यासमोर उभे राहून दाखवा, असं आव्हान देखील याआधी देण्यात आलं आहे. आदित्य ठाकरे यांनी थेट शिंदे यांनाच आव्हान दिल्याने आता एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याविरोधात अतिशय ताकदवान असा नेता निवडणुकीच्या मैदानात उतरवला आहे. तर दुसरीकडे मनेसेच संदीप देशपांडे हे देखील तितकेच तुल्यबळ उमेदवार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात अतिशय चुरशीची आणि तिरंगी लढत होणार आहे.