मुंबई : भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या अशोक चव्हाण यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे भाजपने माजी महिला आमदाराला देखील थेट राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. पक्षासोबत एकनिष्ठ राहिलेल्या महिला आमदाराला थेट राज्यसभेची उमेदवारी मिळाली आहे. भाजप राज्यसभेवर कोणला उमेदवारी देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.
कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी म्हटले होते की, भाजपला त्यांच्या निष्ठेची किंमत दिसत नाही.
मेधा कुलकर्णी हा कोथरूड विधानसभा मतदारसंघातून आमदार होत्या. पण 2019 च्या निवडणुकीत त्यांना महाराष्ट्र भाजपचे तत्कालीन अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी पक्षाचे तिकीट नाकारण्यात आले. ब्राह्मण नेत्या म्हणून त्यांची ओळख होती. त्यांना उमेदवारी नाकारल्याने मतदारसंघातील कार्यकर्ते नाराज झाले होते.
चांदणी चौक उड्डाणपुलाच्या उद्घाटनाचे पोस्टर पाहून मेधा कुलकर्णी यांनी नाराजी व्यक्त केली होती. या प्रकल्प आदरणीय गडकरींकडे प्रकल्प कोणी नेला? मेधाताईंमुळेच हा प्रकल्प हाती घेतल्याचे त्यांनी दोन वर्षांपूर्वी एका भाषणात सांगितले होते. त्यावेळी कोथरूडच्या सध्याच्या एकाही नेत्याचा सहभाग नव्हता. मात्र त्याचे श्रेय इतर लोकं घेत आहे. माझ्यासारख्या लोकांचे अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका ही त्यांनी केली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मेधा कुलकर्णी यांची भेट घेत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता.
महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा आणि कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांचे नाव निश्चिछ झाल्याने कार्यकत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत मेधा कुलकर्णी यांना डावलल्याने त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना ब्राह्मण समाजात होती. त्यामुळे पक्षाने त्यांना राज्यसभा निवडणुकीसाठी तयारी करण्याचे आदेश दिले होते.
निवडणूक आयोगाकडून पंधरा राज्यातील राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली होती. 15 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे. भाजपकडून राज्यसभेसाठी अनेक जण इच्छूक होते. पण आज अखेर अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे या नावांची घोषणा करण्यात आली आहे.