भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. या यादीत काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर काही ठिकाणी विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भाजपकडून विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं जाईल, अशी चर्चा होती. भाजपकडून काही दिग्गजांचं तिकीट कापलं जाईल, अशीदेखील चर्चा होती. अखेर याबाबतचा सस्पेन्स जवळपास संपला आहे. भाजपने गेल्या विधानसभा निवडणुकीत 105 जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे महायुतीत भाजप त्या विद्यमान जागांवर दावा करणार हे साहजिकचं आहे. त्यामुळे या 105 वगळता भाजप आणखी कोणकोणत्या जागांवर लढणार? याबाबत सर्वसामान्यांमध्ये उत्सुकता आहे. अर्थात याबाबतची उत्तरे आगामी काळात स्पष्ट होतील. पण त्यापैकी एक उत्तर आज सर्वसामान्य जनेताला मिळालं आहे. कारण भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे आणि या यादीत एकूण 99 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून ज्या मतदारसंघांची चर्चा होती त्यापैकी कल्याण मतदारसंघाची जास्त चर्चा झाली. त्यामागील कारण देखील तसंच आहे. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठी घडामोड घडली होती. कल्याण पूर्वचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात जावून शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. यावेळी महेश गायकवाड यांचे सहकारी राहुल पाटील यांना देखील गोळ्या लागल्या होत्या. या गोळीबाराची चर्चा देशभरात झाली होती. सुदैवाने महेश गायकवाड आणि राहुल पाटील या गोळीबारातून बचावले.
या घटनेनंतर गणपत गायकवाड यांना अटक झाली. गणपत गायकवाड यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत आपण गोळीबार केला असल्याचं कबूल केलं होतं. त्यामुळे पोलिसांकडे सर्व पुरावे उपलब्ध होते. याशिवाय पोलीस ठाण्यात सीसीटीव्हीत संपूर्ण घटना कैद झाली होती. त्यामुळे गणपत गायकवाड हे तेव्हापासून जेलमध्येच आहेत. गणपत गायकवाड यांना हे गोळीबार प्रकरण प्रचंड भोवलं आहे. कारण तेव्हापासून ते जेलमध्येच आहेत. याशिवाय त्यांच्या कृतीमुळे गणपत गायकवाड यांचं विधानसभेचं तिकीट देखील कापलं गेलं आहे. असं असलं तरी भाजपने गायकवाड यांना दिलासा दिला आहे. कारण भाजपकडून गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
सुलभा गायकवाड या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. गणपत गायकवाड यांना अटक केल्यानंतर सुलभा गायकवाड यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून सुलभा गायकवाड या प्रत्येक समजासाठी काम करत आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी सुलभा गायकवाड यांच्या नेतृत्वात कल्याणपूर्वेत भाजपने महायुतीच्या उमेदवारासाठी काम केलं. सुलभा गायकवाड यांच्याकडून प्रचार देखील सुरु झाला आहे. पण सुलभा गायकवाड यांच्याकडून प्रचार सुरु असताना शिंदे गटात गेलेले नेते निलेश शिंदे हे देखील उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचं बघायला मिळालं.
शिंदे गटाचे नेते निलेश शिंदे यांचे शहरात मोठमोठे बॅनर झळकताना दिसत आहेत. त्यामुळे शिंदे गटाकडून त्यांना उमेदवारी मिळेल का? याबाबत उत्सुकता होती. याशिवाय शिंदे गटाचे नेते विशाल पावशे देखील इच्छुक उमोदवार होते. याशिवाय शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाडी इच्छुक आहेत. महेश गायकवाड यांनी आपल्याला उमेदवारी नाही मिळाली तर बंड पुकारु, असा इशारादेखील याआधी दिला आहे. त्यामुळे या निवडणुकीत कल्याण पूर्वेत मोठी रस्सीखेच बघायला मिळणार आहे.