महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधी अशा सर्व पक्षांच्या तुलनेत भाजप सर्वाधिक जागांवर निवडणूक लढवत आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. महायुतीत तीन मोठे घटक पक्षांसोबत काही लहान पक्षांचादेखील समावेश आहे. तर महाविकास आघाडीतही तसंच गणित आहे. असं असलं तरी काँग्रेस आणि ठाकरे गटापेक्षा जास्त जागांवर भाजप निवडणूक लढवत आहेत. महायुतीत भाजपची बार्गेनिंग पावर जास्त असल्याने भाजप आपल्या 148 उमेदवारांना कमळ चिन्हावर निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. भाजपने 148 जणांना अधिकृत पक्षाकडून उमेदवारी दिली आहे. भाजप पक्ष एवढ्यावरच थांबला नाही तर पक्षाच्या तब्बल 17 नेत्यांना मित्र पक्षांमध्ये प्रवेश करायला सांगत त्यांना शिवसेनेच्या धनुष्यबाण आणि राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर लढायला लावत आहे.
आकडेवारीनुसार, महायुतीत भाजपनं 148, शिंदेंच्या शिवसेनेनं 80, अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं 53, मित्रपक्षांनी 5
जागांवर उमेदवार जाहीर केले. आणि अस्पष्ट चित्र असलेल्या 2 जागा असं एकूण 288 जागांचं गणित आहे. तर 7 जागांवर महायुतीत मविआबरोबरच एकमेकांचेही उमेदवार उभे आहेत. मविआत काँग्रेसने 103, ठाकरेंच्या शिवसेनेनं 89, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं 87, मविआच्या मित्रपक्षांनी 6 जागा घोषित केल्या आहेत. 3 जागांवरचं चित्र स्पष्ट झालेलं नाही. तर 4 जागांवर मविआतीलच उमेदवार एकमेकांच्या आमने-सामने आहेत.