महाराष्ट्राच्या राजकारणातील अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं खरं बिगूल आज वाजताना दिसत आहे. कारण भाजपकडून आज अधिकृतपणे उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. भाजपकडून पहिल्या यादीत 99 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. या यादीत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तसेच काही जणांची तिकीट कापण्यात आले आहे. तर अनेक ठिकाणी विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे भोकरमधून खासदार अशोक चन्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कल्याणमधून आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. कामाठीमधून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारी यादीनुसार, चंद्रशेखर बावनकुळे यांना कामठी विधानसभा मतदरासंघातून तिकीट जाहीर झालं आहे. तर देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण पश्चिममधून उमेदवारी जाहीर झाली आहे. नंदुरबारमधून विजयकुमार गावित यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. धुळ शहरमधून अनुप अग्रवाल यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. शिंदखेडामधून जयकुमार रावल यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाली आहे.
शिरपूरमधून काशीराम पावरा यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर अमोल जावळे यांना रावेर, संजय सावकारे यांना भुसावळ, सुरशे भोळे यांना जळगाव, मंगेश चव्हाण यांना पुन्हा एकदा चाळीसगावातून, गिरीश महाजन यांना जामनेर, आकाश फुंडकर यांना खामगाव, संजय कुटे यांना जळगाव (जामोद), रणधीर सावरकर यांना अकोला पूर्व, प्रताप अडसद यांना धामगाव रेल्वे, प्रवीण तायडे यांना अचलपूर, राजेश बकाणे यांना देवळी, समीर कुणावर यांना हिंगणाघाट, तर डोंबिवलीमधून रविंद्र चव्हाण यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाली आहे.