जळगाव लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विटस्ट आला आहे. भाजपने विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचं तिकीट कापून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. त्यामुळे उन्मेष पाटील हे प्रचंड नाराज झाले आणि या नाराजीतूनच त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. उन्मेष पाटील ठाकरे गटात आल्यानंतर ते निवडणुकीला उभे राहतील अशी चर्चा होती. पण उन्मेष पाटील यांनी स्वत: निवडणूक न लढवता आपल्या सहकाऱ्याचं नाव पुढे केलं. त्यामुळे उन्मेष पाटील यांचे सहकारी करन पवार यांना जळगावमधून तिकीट देण्यात आल्याने जळगावात करन पवार विरुद्ध स्मिता वाघ असा सामना रंगणार आहे. स्मिता वाघ यांनी या युद्धाचं आव्हान स्वीकारलं आहे. करन पवार हे माझे दत्तक पुत्र आहेत. त्यांनी मला आव्हान दिल्याने आई म्हणून हे आव्हान स्वीकारण्यास मी समर्थ आहे, असं स्मिता वाघ यांनी म्हटलं आहे.
स्मिता वाघ यांनी मीडियाशी संवाद साधला. उन्मेष पाटील हे माझे भाऊ आहेत. ते मला सोडून जाणार नाहीत असं मला वाटलं होतं. त्यांच्या हातावर मी रक्षाबंधनाचा धागा बांधला होता. त्यांनी त्याच हातावर आता शिवबंधन बांधलं आहे. त्यामुळे त्यांना आता त्याचं काम करावं. मी माझे काम करणार आहे. एक भाऊ सोडून गेला म्हणून काय झालं? माझ्यासोबत अनेक भाऊ आहेत. गिरीश महाजन आहेत. गुलाबराव पाटील आहेत. सगळे आमदार माझ्या पाठिशी आहेत, असं स्मिता वाघ म्हणाल्या.
ही युद्धभूमी आहे. माझाच विजय होणार असं इथे प्रत्येकाला वाटतं. महाभारतातील कुरुक्षेत्रावरील युद्धप्रमाने एकजात सर्व माझ्यातले माझ्या विरोधात असले तरी मी आज अर्जुनाच्या भूमिकेत आहे. श्रीकृष्ण म्हणून गिरीश महाजन आणि इतर नेते माझ्या पाठिशी आहेत. माझा सर्वात मोठा पाठिराखा जनता आहे. जनता बोलण्यावर नाही तर कामावर अधिक विश्वास ठेवते. श्रीकृष्ण म्हणून युतीचे सर्व नेते, मंत्री माझ्यासोबत आहेत. त्यामुळे मी अर्जुनाच्या भूमिकेत असले तरी सर्व श्रीकृष्ण माझ्यासोबत असल्यामुळे या लढाईत माझाच विजय होईल, असा दावा वाघ यांनी केला.
उन्मेष पाटील माझा भाऊ आहे. तर करन पवार माझा दत्तक पुत्र आहे. त्यांच्याशी आता मला सामना करावा लागत आहे. इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत. देव-देवतांनाही नाही चुकलं ते आता काय चुकणार आहे. त्यामुळे आता माझ्या दत्तक पुत्राने (करन पवार) मला आव्हान दिल असेल, हे आव्हान स्वीकारायला आई म्हणून मी समर्थ आहे. कारण तिच्या पाठीमागे सगळे आहेत, असं त्या म्हणाल्या.
ए. टी नाना पाटील हे 10 वर्ष खासदार आहेत. त्यांची माझ्याशी कुठली नाराजी नाही. ते पक्षासोबत आणि माझ्यासोबत आहेत. त्यामुळे उमेदवारी बदलण्याच्या या नुसत्याच अफवा आणि वायफळ चर्चा आहेत. मला विश्वास आहे, संकटमोचक गिरीश महाजन यांनी सांगितला आहे की, यावेळी उमेदवार बदलला जाणार नाही. भाजप हा देशातील सर्वात मोठा पक्ष आहे. या पक्षात वारंवार उमेदवार बदलण्याच्या चर्चा होत असतील तर त्या नुसत्याच वल्गना आहेत असं समजा, असंही त्या म्हणाल्या.