मुंबई | 13 मार्च 2024 : महायुतीच्या जागावाटपावरुन वेगवेगळ्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असताना आज भाजपने लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे या यादीत महाराष्ट्रातील तब्बल 20 उमेदवारांची नावे आहेत. या यादीत काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर 4 विद्यमान खासदारांचं तिकीट कापण्यात आलं आहे. त्यामुळे या चारही खासदारांना मोठा झटका बसला आहे. भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी पंकजा मुंडे, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना संधी देण्यात आली आहे. तसेच भाजप नेत्या स्मिता वाघ यांनादेखील संधी देण्यात आली आहे. भाजपने या यादीत काही नव्या चेहऱ्यांना संधी दिल्यामुळे 4 विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं हेलं आहे. यामध्ये बीडच्या खासदार प्रीतम मुंडे, उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी, उत्तर पूर्व मुंबईचे खासदार मनोज कोटक आणि जळगावचे खासदार उन्मेश पाटील यांचं तिकीट कापलं गेलं आहे. त्याऐवजी इतर महत्त्वाच्या आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
भाजपने उत्तर मुंबई मतदारसंघातील खासदार गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापलं आहे. त्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. गोपाळ शेट्टी हे मुंबईतील मोठे नेते आहेत. ते मुंबईच्या बोरीवली विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा आमदार म्हणून जिंकून आले आहेत. तसेच उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा खासदार म्हणून जिंकले आहेत. त्यामुळे गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपाळ शेट्टी यांना भाजपच्या हायकमांडने स्पेशल फोन करुन उमेदवारी मिळणार नसल्याची माहिती दिली. त्यांच्या मतदारसंघातून भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गोयल यांना जिंकून येण्यासाठी प्रचार करावा, असा मेसेज भाजपच्या हायकमांडने गोपाळ शेट्टी यांना दिला आहे.
भाजपने बीड लोकसभा मतदारसंघातून प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापलं आहे. या मतदारसंघातून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. पंकजा या महाराष्ट्राच्या माजी महिला-बालविकास मंत्री आहेत. त्यांचा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. तेव्हापासून भाजपकडून त्यांचं राजकीय पुनर्वसन कधी केलं जाईल? अशी चर्चा सातत्याने सुरु होती. प्रत्येक राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीला पंकजा मुंडे यांचं नाव चर्चेत येत होतं. अखेर भाजपने बीड लोकसभेसाठी पंकजा यांचं नाव जाहीर केलं आहे. पण यामुळे त्यांच्या बहीण आणि विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापलं गेलं आहे. आता त्यांचं राजकीय पुनर्वसन कसं होईल? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मनोज कोटक यांच्याबाबत सांगायचं झालं तर ते तीन वेळा मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. ते महापालिकेत भाजपचे मुख्य नेते होते. भाजपने त्यांना 2019 मध्ये पहिल्यांदा लोकसभेची संधी दिली होती. या निवडणुकीत त्यांचा विजय झाला होता. पण आगामी निवडणुकीत त्यांचं तिकीट कापण्यात आलं आहे. त्यांच्याऐवजी मिहीर कोटेचा यांना संधी देण्यात आली आहे. मिहीर कोटेचा हे गेल्या 10 वर्षांपासून आमदार आहेत. ते मुलुंड विधानसभा मतदारसंघातून दोनवेळा जिंकून आले आहेत.
जळगाव लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबतचा सस्पेन्स अखेर संपला आहे. कारण विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचं तिकीट कापलं जाणार अशी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. त्यामुळे अनेक जण इच्छुक असल्याची चर्चा होती. जळगाव लोकसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. कारण या मतदारसंघात अनेक वर्षांपासून भाजपचा खासदार निवडून येतोय. भाजपने जळगावचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचं लोकसभेचं तिकीट कापलं आहे. त्याऐवजी जळगावातील भाजप नेत्या स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. स्मिता वाघ 2009 मध्ये जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून निवडून आल्या होत्या. तर 2017 मध्ये त्या विधान परिषदेच्या आमदार म्हणून निवडून आल्या आहेत.