Ram Shinde On Ajit Pawar: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले. काही ठिकाणी महायुतीच्या उमदेवारांचा पराभव झाला. आता त्या पराभवावरुन महायुतीमधील नाराजी समोर येऊ लागली आहे. कर्जत जामखेडमध्ये महायुतीमधील भाजपचे उमेदवार राम शिंदे यांचा केवळ 1243 मतांनी पराभव झाला. पवार कुटुंबातील रोहित पवार या मतदार संघात विजयी झाले. मतदार संघात युतीचा धर्म पाळला गेला नाही. माझा बळी दिला गेला. कुटुंबात अघोषित करार झाला होता, हे आता सिद्ध झाल्याचे राम शिंदे यांनी म्हटले आहे. त्यामुळे महायुतीमधील नाराजीनाट्य समोर आले आहे.
अजित पवार यांचे वक्तव्य समोर आले. त्यावरुन कर्जत जामखेडमध्ये माझा बळी गेला हे सिद्ध झाले. मला हे माहिती होते. पण त्यावर विश्वास बसत नव्हता, असे राम शिंदे म्हणाले. ते पुढे म्हणाले, अजितदादा आज बोलले की मी सभेला आलो असतो तर तुझे (रोहित पवार) काय झाले असते हे उघड झाले आहे. रोहित पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला नाही. महायुतीचा धर्म पाळणे अपेक्षित होते. परंतु तसे झाले नाही. रोहित पवार बारामतीमध्ये येऊ नये आणि अजित पवार यांनी कर्जत जामखेडमध्ये येऊ नये. पवार कुटुंबात अघोषीत करार झाला होता. त्यामुळे खूप कमी मताच्या फरकाने मी पडलो आहे. मी कटाचा बळी ठरलो आहे, असे त्यांनी म्हटले.
महायुतीच्या नेत्यांवर प्रश्न उपस्थित होणे हे महायुतीसाठी हे चांगले नाही. या मतदार संघाची फेरमतमोजणी करण्याचा मी अर्ज केला होता. पण तो त्यावेळी फेटाळला होता. त्यामुळे मी जिल्हाधिकाऱ्यांककडे अपील करणार आहे. माझ्यासमोर मोठी बलाढ्य शक्ती होती. महायुतीच्या लोकांबरोबर असे होत असेल तर बरोबर नाही, असे राम शिंदे यांनी म्हटले.
कराडमधील प्रीतीसंगमावर अजित पवार आणि रोहित पवार यांची भेट झाली. यावेळी अजित पवार यांनी रोहित पवार यांना जोरदार टोला लगावला. ते म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला. माझी सभा झाली असती तर काय झाले असते. त्यावर रोहित पवार म्हणाले, तुमची सभा झाली असती तर निकाल वर-खाली झाला असता. या ठिकाणी 1 लाख 27 हजार 676 मते रोहित पवार यांना तर राम शिंदे यांना 1 लाख 26 हजार 433 मते मिळाली. म्हणजेच 1243 मतांनी रोहित पवार विजयी झाले.