लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील राजकारणात मोठे बदल होत आहे. निवडणूक प्रचार जोरात सुरु असताना पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात अनेक कार्यकर्ते अन् पदाधिकारी जात आहे. प्रत्येक पक्षाला या आयाराम-गयारामचा फटका बसत आहे. आता सांगलीमध्ये भाजपला धक्का बसला आहे. सांगली लोकसभा मतदार संघामध्ये काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्यासाठी भाजपच्या चार नगरसेवकांनी पक्ष सोडला आहे. पक्षाचा राजीनामा देऊन या नगरसेवकांनी विशाल पाटील यांना पाठिंबा दिला आहे. त्यांच्याकडून भाजपविरोधात उघड प्रचार होत होता.
मिरजेतील भाजपच्या नगरसेवकांकडून विशाल पाटलांच्या प्रचारामध्ये सहभाग घेतला होता. यामुळे भाजपच्या शहर जिल्हाध्यक्षांकडून संबंधित चार नगरसेवकांवर कारवाईचा प्रस्ताव प्रदेश कार्यालयाकडे पाठवण्यात आला. मात्र कारवाईच्या आधीच भाजपचे बंडखोर नगरसेवक संदीप आवटे, निरंजना आवटी, आनंदा देव माने आणि शिवाजी दुर्वे यांनी आपल्या भाजपच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांना भाजपमधील आणखी तीन नगरसेवकांचा छुपा पाठिंबा असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. त्यामुळे भाजपचे विद्यमान खासदार आणि उमेदवार संजयकाका पाटील यांच्या बद्दलची पक्षातील नाराजी उघडपणे आता समोर आली आहे.
माझी उमेदवारी कोणत्याही स्वार्थासाठी नाही. मी केलेले बंड हे स्वतःसाठी केलं नाही, पक्षासाठी केले आहे. पक्षाचे विचार जिवंत राहिले पाहिजे, आपला उद्देश असल्याचे विशाल पाटील यांनी म्हटले आहे. माझ्या कुटुंबाचे काँग्रेस पक्षासाठी योगदान पाहता काँग्रेस पक्ष माझ्यावर कारवाई करेल असे मला वाटत नाही. मला कोणत्याही पद्धतीची लेखी सूचना अद्यापही आलेली नाही. इतर पक्षाचे लोक दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या लोकांना माझा एवढा सल्ला आहे, आपण आपापले घर बघा काँग्रेस पक्ष कसा चालवायचा हे काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना चांगलेच माहीत आहे.
वसंतदादा पाटील यांनी माणसं कमावले माणसंही त्यांची संपत्ती होती. वसंत दादांची हीच संपत्ती माझी आहे, असे विशाल पाटील यांनी म्हटले आहे. निकालानंतर समजेल कोण भाजपच्या बाजूने लढत होते. मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की सर्वजण माझ्याच विरोधात बोलतात. पण जनतेने ठरवले आहे, त्यामुळे माझा विजय निश्चित आहे, असा टोला खासदार संजय राऊत यांना विशाल पाटील यांनी लगावला आहे.