ज्ञानेश्वर लोंढे, Tv9 प्रतिनिधी : काँग्रेसचे नेते माजी मंत्री डी. पी. सावंत यांनी काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसमधून भाजपात गेलेले खासदार अशोक चव्हाण यांचे निकटवर्ती वर्गमित्र म्हणून त्यांची ओळख आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केल्यानंतर डी. पी सावंत ही भाजपात जातील अशी चर्चा होती. मात्र या चर्चेवर आता पडदा पडला आहे. माजी मंत्री डी. पी. सावंत यांनी स्वत: याबाबत भूमिका मांडली आहे. आपण काँग्रेस सोडून कुठेही जाणार नाही, असं डी. पी. सावंत यांनी स्पष्ट केलं आहे. अशोकराव चव्हाण वर्गमित्र आहेत, ते राहतील, मनाचा आवाज ऐकून मी काँग्रेसमध्येच राहायचं ठरवलं आहे, असं डी. पी. सावंत यांनी सांगितलं. नांदेड उत्तर मतदारसंघातून काँग्रेसकडून उमेदवारी मागितल्याचे डी. पी. सावंत यांनी यावेळी सांगितलं.
“मी काँग्रेसमध्येच होतो. मी काँग्रेस कधी सोडली नाही. काँग्रेसमधून मी नांदेड उत्तरमधून 15 वर्षे प्रतिनिधित्व केलं आहे. मी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. अशोकराव चव्हाण वर्गमित्र आहेत. ते राहतीलच. ते संबंध कधी तोडत नाहीत. मैत्री आणि राजकारण याची सांगड मला घालावीशी वाटत नाही”, असं स्पष्टीकरण डी. पी. सावंत यांनी दिलं.
“मला कार्यकर्त्यांनी सांगितलं, आपण आहोत तिथेच चांगले आहोत. अनेक लोकांनी फोन करून सांगितलं तुम्ही जिथे आहात तिथेच राहा म्हणून मी काँग्रेसकडून तिकीट मागितलं आहे. राजकीय दृष्ट्या भाऊ-बहीण वेगवेगळे लढतात. घराघरात लोक आहेत. राजकारण आणि मैत्री याची सीमा जी आहे किंवा त्यातील पुसट रेघ आहे ती ओलांडता कामा नये. एवढी काळजी घेतली तर राजकारण चांगलं होईल”, असं डी. पी. सावंत म्हणाले.
“आमच्या विचारसरणीचं नातं आहे. आम्ही तिकीट मागायचं काम केलं. काँग्रेसमध्येच आमचं मन रमतं म्हणून मी तिकीट मागितलं. पक्षाने तिकीट नाही दिलं तरी काँग्रेसमध्ये राहू आणि काँग्रेसचं काम करू”, अशी प्रतिक्रिया डी. पी. सावंत यांनी दिली. “विरोध हा प्रत्येकाला, प्रत्येक ठिकाणी होत असतो. राजकारणात ते जास्त असतं. मी 15 वर्षांपासून आमदार आहे. मला पहिल्यांदा तिकीट मिळालं तेव्हा पक्षातील लोक विरोधात होते”, असं डी. पी. सावंत म्हणाले.
अशोकराव चव्हाण यांनी सुरुवातीला सांगितलं होतं. मी भाजपमध्ये यायची कोणाला जबरदस्ती करणार नाही. तशी त्यांनी जबरदस्ती केली नाही. मी मनाचा आवाज ऐकून काँग्रेसमध्ये राहायचं ठरवलं आहे. मी माझी भूमिका पक्षश्रेष्ठींच्या कानावर घातली आहे. काँग्रेसचे उमेदवारी कोणाला द्यायची हा निर्णय पक्षश्रेष्ठींना घ्यायचा आहे, असं मत डी. पी. सावंत यांनी मांडलं.