Devendra Fadnavis : लाडकी बहिण योजनेसाठी पाच वर्षांची तरतूद का नाही? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर

| Updated on: Aug 17, 2024 | 3:33 PM

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा पुणे बालेवाडी येथे कार्यक्रम सुरु आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना कधीपर्यंत सुरु राहणार? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. त्याला भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.

Devendra Fadnavis : लाडकी बहिण योजनेसाठी पाच वर्षांची तरतूद का नाही? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
Devendra Fadnavis
Follow us on

सध्या सगळ्या राज्यात लाडकी बहिण योजनेची चर्चा आहे. आज पुणे बालेवाडी येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा कार्यक्रम सुरु आहे. या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली. “अरे नालायकांनो आई आणि बहिणीचं प्रेम कोणीही विकत घेऊ शकत नाही. ही तर माता भगिनींप्रती आमची कृतज्ञता आहे. तुमच्या साथीनेच आम्हाला यश मिळतं. त्या यशाची ओवाळणी म्हणून आम्ही हे सहाय्य करतो. जे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले त्यांना 1500 रुपयांचं मोल समजू शकत नाही” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“जे हॉटेलात दोन दोन हजाराची टीप देतात, त्यांना मोल काय समजणार? त्यांच्या खिशात माल आहे. पण माझ्या माय माऊलीला 1500 रुपयांचं मोल समजतं. तुम्ही कितीही दुषणं दिली तरी, जोपर्यंत माय माऊलींचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे, तोपर्यंत आमचं कोणीही काही करू शकत नाही” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

लाडकी बहिण योजनेसाठी पाच वर्षांची तरतूद का केली नाही?

“अजितदादांनी मार्चपर्यंतची पूर्ण व्यवस्था केली आहे. तुम्ही आशीर्वाद दिला तर 2025 पर्यंतची व्यवस्था, नंतर 2026 पर्यंतची नंतर 2027 पर्यंतची व्यवस्था करू. बजेटमध्ये एकच वर्षाची तरतूद करता येते. पाच वर्षाच्या तरतुदीची सोय असती तर आम्ही पाच वर्षाची तरतूद केली असती. भाजपचं सरकार असलेल्या राज्यातील सर्व योजना सुरू आहेत. पण काँग्रेसने कर्नाटकात योजना सुरू केली पण नंतर बंद केली” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

‘आमच सरकार आलं तर 3000 देऊ’

आज संजय राऊत यांना पत्रकार परिषदेत लाडकी बहिण योजना टर्निंग पॉइंट ठरणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, “ही काही नवीन क्रांती केलेली नाही. याआधी सुद्धा महिलांसाठी अशा योजना आणल्या आहेत. फडणवीस, अजितदादा आणि मिंधे स्वत:च्या खिशातले 1500 रुपये देत नाहीयत. हा लोकांच्या कराचा पैसा आहे. आमच सरकार आलं, तर आम्ही 3000 रुपये देऊ हा आमचा शब्द आहे”