पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी भाजपचा जाहीरनामा जाहीर केला. त्या जाहीरनाम्याची माहिती देण्यासाठी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जाहीरनाम्यातील विविध तरतुदींची माहिती देताना त्यांनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले. श्रीकांत शिंदे फाउंडेशनमध्ये संशयास्पद आर्थिक व्यवहार होत आहेत, श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या कार्यासाठी ज्यांनी कोट्यावधी रुपये दिले ते दानशूर कोण? असे अनेक आरोप केले. याबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर फडणवीस यांनी राऊत यांना डिवचणारे उत्तर दिले.
संजय राऊत यांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांना विचारल्यावर ते म्हणाले, कोण संजय राऊत? तुम्ही माझ्या क्वॉलिटीच्या लोकासंदर्भात प्रश्न विचारला. प्रश्न विचारताना माझा स्तर तरी पाहा, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. संजय राऊत यांच्या आरोपांवर बोलण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला. ओबीसीसंदर्भात राहुल गांधी यांनी भाजपवर आरोप केले होते. भाजपने ओबीसींसाठी काय केले? असा प्रश्न राहुल गांधी यांनी केला होता. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला. ते म्हणाले, “काँग्रेसने ओबीसींचा वापर केवळ मतपेटीसाठी केला. ओबीसींचे कल्याण केवळ भाजपने केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात सर्वाधीक ओबीसी मंत्री आहेत.”
देशाचे संविधान कोणीच समाप्त करु शकत नाही. विरोधकांकडे मुद्ये नाहीत, यामुळे भाजप संविधान बदलणार? असे आरोप ते करत आहेत. संविधानाची हत्या काँग्रेसनेच केली आहे. आणीबाणी लागू करुन संविधान संपवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. उलट पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी आल्यावर त्यांनी सर्वात प्रथम संविधानाची पूजा केली, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी होत आहे. राज्यातील या पाचही जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होणार असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. काँग्रेसने त्यांचे सरकार आल्यावर अग्निवीर योजना बंद करण्याचा आश्वसन दिले आहे. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, जगभरातील सैन्य युवा आहे. आपले सैन्य युवा असावे, यासाठी अग्नीवीर योजना आणण्यात आली. ती योजना बंद करुन देशाचे नुकसानच होणार आहे.