महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला आहे. एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी आपण नाराज नसल्याचंदेखील स्पष्ट केलं. भाजपचे केंद्रीय नेतृत्व जो निर्णय घेईल, ते आपल्याला मान्य असल्याचं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. एकनाथ शिंदे यांच्या या पत्रकार परिषदेनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तातडीची पत्रकार परिषद घेतली. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेचं स्वागत करत त्यांचं कौतुक केलं. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांची देखील प्रतिक्रिया समोर आली. अजित पवार यांनीदेखील एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेचं स्वागत केलं. तसेच मुख्यमंत्रीपदाबाबत उद्या दिल्लीत निर्णय होणार असल्याचं स्पष्ट केलं. यानंतर आता भाजपचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज संध्याकाळी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
“आमच्या महायुतीत कुठलेही मतभेद नाहीत. आम्ही निवडणुकीच्या पूर्वीदेखील सांगितलं होतं. सर्व निर्णय सोबत घेऊन होतील. आमचे पक्षश्रेष्ठी आहेत, ते आमच्यासोबत बसून सर्व निर्णय घेतील. त्याप्रमाणेच सर्व निर्णय होणार आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की, कुणाच्या मनात काही किंतू-परंतू असतील तर एकनाथ शिंदे यांनी दूर केलेला आहे”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी महत्त्वाचा प्रश्न विचारला. भाजपच्या कार्यकर्त्यांची देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावी, अशी मागणी आहे. त्यावर काय सांगाल, तुम्ही मुख्यमंत्री होणार का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी फार काही न बोलता थेट हात जोडले आणि त्यावर काहीच न बोलणं पसंत केलं. तसेच “आता आमच्या पक्षश्रेष्ठींसोबत आमची बैठक होईल”, असं ते पुढच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.
“आमच्या महायुतीत कधीच एक-दुसऱ्याप्रती वेगळं मत राहिलेलं नाही. आम्ही एकत्र बसूनच निर्णय घेतले आहेत. काही लोकांच्या मनात ज्या शंका होत्या त्यांना दूर करण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. आम्ही आमच्या नेत्यांसोबत भेटून निर्णय घेऊ”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांना सरकार कधीपर्यंत स्थापन होईल? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर फडणवीसांनी “थोडी प्रतिक्षा करा”, अशी प्रतिक्रिया दिली.