महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा ट्विस्ट, राजीनाम्याच्या तयारीत असलेले फडणवीस अजित पवारांच्या भेटीला, दिल्लीत हालचाली वाढल्या

| Updated on: Jun 07, 2024 | 4:06 PM

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकीय गणितं बदलतील अशी चर्चा होती. विशेष म्हणजे त्याच दिशेने आता घडामोडी घडत तर नाहीत ना? अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा ट्विस्ट, राजीनाम्याच्या तयारीत असलेले फडणवीस अजित पवारांच्या भेटीला, दिल्लीत हालचाली वाढल्या
BJP Devendra Fadnavist Ajit Pawar
Follow us on

महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा ट्विस्ट आलेला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनाम्याच्या तयारीत आहेत. त्यांनी आपल्या पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला आपल्याला पक्ष संघटनेच्या कामासाठी उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावं असं म्हटलं आहे. फडणवीसांच्या या भूमिकेला महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी आणि मंत्र्यांनी विरोध केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत राहून पक्ष संघटनेचं आणि आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काम करावं, असं भाजप नेत्यांचं म्हणणं आहे. पण देवेंद्र फडणवीस हे राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी फोन केल्याची देखील माहिती समोर आली होती. यावेळी अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांना चर्चेसाठी दिल्लीत बोलावून घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या सर्व घडामोडींनंतर देवेंद्र फडणवीस काल दुपारी दिल्लीसाठी रवाना झाले. त्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यानंतर आज एनडीएच्या सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आणि खासदारांची संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत एनडीएच्या घटक पक्षांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासाठीच्या प्रस्तावावर समर्थन दिलं. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनमोकळेपणाने मोदी सरकारचा गाजावाजा करत भूमिका मांडली आणि मोदींचं समर्थन केलं. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार हे खूप तोलूनमापून बोलताना दिसले. त्यांनी मोदींना आपलं समर्थन असल्याचं देखील यावेळी स्पष्ट केलं.

दिल्लीत महायुतीमध्ये मोठ्या घडामोडी

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकीय गणितं बदलतील अशी चर्चा होती. विशेष म्हणजे त्याच दिशेने आता घडामोडी घडत तर नाहीत ना? अशी चर्चा आता रंगू लागली आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मिळालेला भरघोस यश हा अजित पवारांच्या डोकेदुखी ठरताना दिसत आहे. अजित पवार गटातील आमदारांमध्ये यामुळे कमालीची अस्वस्था निर्माण झाल्याची चर्चा आहे. दुसरीकडे शिंदे गटाचे काही खासदार आगामी काळात ठाकरे गटात प्रवेश करतील, असं भाकीत काही जणांकडून वर्तवलं जात आहे. दुसरीकडे भाजपला महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणामुळे जनतेने सपशेल नाकारलेलं आहे. महायुतीतील तीनही घटकपक्षांना लोकसभेच्या निकालाने दु:ख दिलं आहे. आता या दु:खातून सावरुन आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला कसं चितपट करावं यासाठी महायुतीत हालचाली घडण्याचे चिन्हं आहेत. त्यामुळेच दिल्लीत आज मोठ्या घडामोडी घडत असल्याची माहिती मिळत आहे.

प्रफुल्ल पटेल यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी खलबतं

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनडीएच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अजित पवारांच्या भेटीसाठी खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या दिल्लीतील निवासस्थानी गेल्याची माहिती आहे. त्यांच्यासोबत खासदार रक्षा खडसे आणि स्मिता वाघ या देखील असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे फडणवीस प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी दाखल झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील प्रफुल्ल पटेल यांच्या घरी दाखल झाले आहेत. आता प्रफुल्ल पटेल यांच्या घरी महायुतीची महत्त्वाची बैठक पार पडत असल्याची माहिती आहे. फडणवीस एकीकडे राजीनामा देण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. त्यामुळे या बैठकीला जास्त महत्त्व आहे. या प्रकरणात आता काय-काय घडामोडी घडतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.