लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून महाराष्ट्राच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाल्यापासून पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात नवं वादळ घोंघावत होतं. या वादळाचा फटका भाजपला बसणार असे स्पष्ट संकेत तेव्हा दिसत होते. भाजपकडून हे वादळ शमवण्यासाठी प्रयत्नही करण्यात आले. भाजपचे संकटमोचक अशी ख्याती असलेले नेते मंत्री गिरीश महाजन यांनी हे वादळ शमवण्यासाठी प्रयत्न केले. पण वादळ शांत झालं नाही. याउलट या राजकीय वादळाचे वारे जोराने वाहू लागले. हे वादळ शांत व्हावं यासाठी स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रयत्न करण्यात आले. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. अखेर भाजप पक्षाला पश्चिम महाराष्ट्रात भलंमोठं खिंडार पडणार आहे. भाजपमध्ये अंतर्गत कलहाचा सर्वात मोठा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला होताना दिसतोय. कारण शरद पवार गटात भाजपच्या बड्या नेत्याचा प्रवेश होणार आहे. स्वत: शरद पवारांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड घडामोडी घडत आहेत. भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील हे माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यांनी भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर होण्याआधीच आपल्या उमेदवारीचा दावा केला होता. पण भाजपने माढ्याचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे मोहिते पाटलांचा गट प्रचंड नाराज झाला. फक्त धैर्यशील मोहिते पाटील नाराज झाले नाहीत. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर हे देखील नाराज झाले. त्यांनी तर उघडपणे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध केला. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची भाषा केली. ते लवकरच आता शरद पवार गटात प्रवेश करतील, अशीदेखील चर्चा आहे.
धैर्यशील मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला राष्ट्रवादी शरद पवार गटातून उमेदवारी दिली जाईल, अशी माहिती समोर आली होती. त्यानंतर आता धैर्यशील मोहिते पाटील यांचं नाव निश्चित झाल्याचीदेखील चर्चा आहे. विशेष म्हणजे याबाबतच्या आज अतिशय महत्त्वाच्या हालचाली घडल्या आहेत. धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज शरद पवार यांची प्रत्यक्ष भेट घेतली आहे. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ चर्चा झाली. या बैठकीनंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी वेट अँण्ड वॉच अशी प्रतिक्रिया दिली. तर शरद पवार यांनी यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशाची बातमीच देवून टाकली.
“धैर्यशील मोहिते पाटील मला भेटून गेले. धैर्यशील मोहिते पाटील 2 दिवसात पक्षात येणार आहेत”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. त्यामुळे आता धैर्यशील मोहिते पाटील यांच्या राष्ट्रवादी शरद पवार गटातील पक्षप्रवेशाचं वृत्त खरं ठरलं आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धैर्यशील मोहिते पाटील यांचा येत्या 14 एप्रिलला पक्षप्रवेश होणार आहे. त्यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून महाविकास आघाडीचे माढा लोकसभा मतदारसंघासाठी अधिकृत उमेदवारी दिली जाणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजप खासदार विरुद्ध पूर्वाश्रमीचे भाजपचे दिग्गज नेते अशी थेट लढत होण्याचे संकेत मिळत आहेत. भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील असा सामना या निवडणुकीत बघायला मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ही निवडणूक दोन्ही पक्षांसाठी आणि उमेदवारांसाठी प्रतिष्ठेची असणार आहे.