भाजपचा पहिला नेता ठाण्यात, ‘संकटमोचक’ सत्ता स्थापनेचा तिढा सोडवणार? हालचालींना वेग

| Updated on: Dec 02, 2024 | 8:19 PM

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गिरीश महाजन एकनाथ शिंदे यांना तब्येतीची विचारपूस करताना दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय चर्चेची शक्यता आहे. गिरीश  महाजन देवेंद्र फडणवीस यांचा कोणता संदेश देणार? याकडेही राज्याचं लक्ष आहे.

भाजपचा पहिला नेता ठाण्यात, संकटमोचक सत्ता स्थापनेचा तिढा सोडवणार? हालचालींना वेग
एकनाथ शिंदे आणि गिरीश महाजन
Follow us on

महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी समोर येत आहे. भाजपचे संकटमोचक म्हणून ख्याती असलेले ज्येष्ठ नेते गिरीश महाजन महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेले आहेत. गिरीश महाजन हे एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी गेले आहेत. एकनाथ शिंदे यांची सध्या प्रकृती बरी नाही. त्यामुळे शिंदे यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची देखील माहिती समोर आली होती. या सगळ्या घडामोडींदरम्यान आता भाजपचा पहिला नेता एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी दाखल झाला आहे. शिंदे यांना गेल्या दोन दिवसांपासून बरं नसल्याची माहिती आहे. ते दोन दिवस त्यांच्या साताऱ्यातील दरेगावात मुक्कामी होते. तिथे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेतले. त्यानंतर ते मुंबईत दाखल झाले होते. पण त्यांची पुन्हा प्रकृती खालावल्याने त्यांची शिवसेना नेत्यांसोबतची आजची बैठक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे. या सर्व घडामोडींदरम्यान गेल्या दोन-तीन दिवसात एकाही भाजप नेत्याने शिंदेंची भेट घेतली नव्हती. यानंतर आज गिरीश महाजन हे भेट घेणारे भाजपचे पहिले नेते आहेत.

गिरीश महाजन हे एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानी दाखल झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना फोन करुन तब्येतीची विचारपूस केल्याची माहिती आहे. डॉक्टरांनी एकनाथ शिंदे यांना आरामाचा सल्ला दिला आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे आणि गिरीश महाजन यांच्या भेटीत काही राजकीय विषयांवर चर्चा होते का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गिरीश महाजन एकनाथ शिंदे यांना तब्येतीची विचारपूस करताना दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय चर्चेची शक्यता आहे. गिरीश  महाजन देवेंद्र फडणवीस यांचा कोणता संदेश देणार? याकडेही राज्याचं लक्ष आहे. महाजन यांनी आज दुपारीच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यामुळे गिरीश महाजन आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीत राजकीय चर्चेची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

‘संकटमोचक’ सत्ता स्थापनेचा तिढा सोडवणार?

गिरीश महाजन हे भाजपचे संकटमोचक नेते आहेत. त्यांना पक्षाकडून अनेकदा अडचणीच्या काळात ते संकट परतवण्याची जबाबदारी दिली जाते. राज्यात आता विधानसभेचा निकाल लागून 9 दिवसांचा कालावधी पार पडला आहे. पण तरीहीदेखील सत्ता स्थापनेचा तिढा सुटलेला नाही. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला आहे. त्यांनी माध्यमांसमोर येत भाजपच्या मुख्यमंत्र्याला आपला पाठिंबा असेल, असं जाहीर केलं आहे. पण तरीही एकनाथ शिंदे यांना गृह खातं हवं असल्याची माहिती आहे. या गृह खात्यावरुनच सत्ता स्थापनेचा तिढा असल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, भाजपकडून शपथविधीचा कार्यक्रमही जाहीर झाला आहे. यानंतर आता गिरीश महाजन एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले आहेत.