मुंबईः राज्यातली महाविकास नव्हे, तर महाघोटाळा आघाडी आहे. या सरकारमधील मंत्र्यांची झोप उडाली आहे. कोणी बेनामी प्रॉपर्टीसाठी आई, मायचा तर कोणी ताई, पत्नीचा वापर करत आहे, अशा आरोपांची राळ रविवारी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी उडवून दिली. ते मुलुंड येथे बोलत होते.
मलिक खोली बुक करतायत का?
सोमय्या म्हणाले, नवाब मलिक एवढे का घाबरत आहेत? की ते अनिल देशमुखच्या शेजारची आर्थर रोड जेलची खोली बुक करत आहेत का? मलिकांनी वक्फबोर्ड जमिनीचा घोटाळा केला असेल तर त्यांच्यावर निश्चित कारवाई होणार. मग ते नवाब असो की मलिका. कोणत्याही घोटाळेबाजांना सोडणार नाही. आतापर्यंत आम्ही 28 घोटाळे काढले. कदाचित 29 वा नंबर नवाब मालिक असू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.
मंत्री झोपत नाहीत…
सोमय्या म्हणाले की, मी क्षमा मागतो. मला लोक येऊन तक्रार करतात. मात्र, मंत्री-नेते तुमच्यामुळे झोपत नाहीत. सध्या एक मंत्री झोपत नाही. सर्व मंत्री आणि अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे. यांनी एवढे हजारो कोटींचे घोटाळे केले आहेत की, त्यापैकी काही जेलमध्ये तर काही बेल वरती आहेत. आता नुसती मंत्र्यांची नव्हे, तर सरकारची झोप उडणार आहे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर आरोप
सोमय्यांनी उद्धव ठाकरे, अजित पवार आणि भावना गवळी यांच्यावर शरसंधाण साधले. ते म्हणाले, उद्धव ठाकरेंनी देखील तेच केले आहे. बायकोच्या नावाने 19 बंगले दाखवले. अजित पवार यांनी बायको, ताई, मुलगा, पत्नीच्या नावावर 1050 कोटीची बेनामी प्रॉपर्टी दाखवली. भावना गवळी देखील तेच करत आहे, असा आरोप त्यांनी केला.
भावना गवळींचा 100 कोटींचा घोटाळा
भावना गवळी यांनी 100 कोटींचा घोटाळा केला आहे. 69 कोटी चॅरिटेबल संस्थेकडून स्वतःच्या प्रायव्हेट कंपनीमध्ये ट्रान्सफर केले आहेत. त्याचे मालक कोण? भावना गवळींचे सहकारी शहीद खान ते देखील जेलमध्ये आहेत. आता भावना गवळी हजर झाल्या नाहीत, तर त्यांच्या आईवर कारवाई होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला. ठाकरे सरकारचे नेते असे आहेत. कोणी आईचा, तर कोणी मायचा वापर करत आहे. मुख्यमंत्र्यांची तब्येत लवकर बरी होऊ द्या. त्यांच्याबद्दल आता तरी काही बोलत नाही, असे सांगायलाही सोमय्या विसरलेन नाहीत.
1 डिसेंबरला जालन्याला जाणार
महाविकास आघाडी नव्हे ही महाघोटाळा आघाडी आहे. जरंडेश्वरचा साखर कारखाना त्यांना परत मिळावा यासाठी हायकोर्टात धडपड चालू आहे. जालना जिल्ह्यातले शेतकरी माझ्याकडे आले होते. आता मी एक तारखेला जालन्याला जाणार आणि त्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार आहे. त्याच पद्धतीने 30 तारखेला मी अमरावतीला जाण्याची इच्छा व्यक्त केली, तर मला सरकारने प्रतिबंध केला. आता पहिली भेट शनी मंदिर आणि पुजारीवरती ज्याने हल्ला केला होता त्याचा हिशेब समजून घेणार आहे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.