नाशिकः सलग दोन दिवस मंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत विविध कार्यक्रमांना एकाच व्यासपीठावर हजेरी लावणाऱ्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांची घरी जावून भेट घेतली. यामुळे जिल्ह्यात नाना अटकळींसह चर्चेला उधाण आले आहे. भुजबळ-कांदे वादासाठी हा शिष्टाईचा तरी प्रयत्न नव्हे ना, असे अंदाजही अनेकांनी बांधलेयत.
पंकजा मुंडे यांच्या नाशिक दौऱ्याची चर्चा खूप दिवसांपासून सुरू होती. त्यांना आणि भुजबळ यांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा योग भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी जुळवून आणला. पंकजांनी सलग दोन दिवस भुजबळांसोबत वेगवेगळ्या कार्यक्रमांना एकाच व्यासपीठावर हजेरी लावली. दोन दिग्गज ओबीसी नेते एकत्र आल्याने ते काय बोलणार याची उत्सुकता होती. याच काळात भुजबळांनी ओबीसी पर्वाचा नारा दिला. हे कार्यक्रम संपल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि अचानक शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्या कॉलेजरोड येथील घरी भेट दिली. त्यांच्या कुटुंबासोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे अनेकांनी वेगवेगळ्या अटकळी बांधल्या. शिवसेना आमदार कांदे आणि भुजबळांच्यातील वाद सध्या भरपूर गाजतो आहे. या वादाच्या शिष्टाईसाठी पकंजांनी भेट घेतल्याची चर्चा झाली.
कांदे म्हणतात…
शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी मात्र या चर्चांना पूर्णविराम दिला. आमचे आणि पंकजा मुंडे यांचे घरगुती संबंध आहेत. मी त्यांना बहिणीप्रमाणे मानतो. दरवर्षी आम्ही दिवाळीत भेट घेतोच. या वर्षी योगायोगाने पंकजा या नाशिकमध्ये आहेत. त्यामुळे त्यांनी आमच्या घरी हजेरी लावली. त्यांना मी दिवाळीचा फराळ दिला. भाऊबीज म्हणून दोन पैठण्या दिल्या, अशी प्रतिक्रिया कांदे यांनी दिली.
वाद पोलिसांच्या कोर्टात
शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी नियोजन समितीचा निधी विकल्याबाबत छगन भुजबळांविरोधात याचिका दाखल केली आहे. ही याचिका मागे घ्यावी म्हणून आपल्याला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन टोळीचा धमकीचा फोन आल्याचा दावा कांदे यांना केला होता. या प्रकरणी पोलीस आयुक्तांनी चौकशी सुरू केली आहे. त्यांनी काल आमदार कांदे यांचा जबाब नोंदवला. येत्या चार तारखेला या प्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याचा पुतण्या अक्षय निकाळजे यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. त्यानंतर या धमकी प्रकरणामागे कोण, हे समोर येण्याची शक्यता आहे. मात्र, कांदे यांची प्रतिक्रिया पाहता हा वाद येणाऱ्या काळात वाढणार अशीच शक्यता आहे.
इतर बातम्याः
Special Report: तुझं हसणं माझ्या जगण्याची भाकरीय; जगात सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या एका मुलखावेगळ्या कवीची गोष्ट!https://t.co/rIFR65qDOq#SpecialReport|#PabloNeruda|#Poet|#RevolutionaryPoet|#Chile
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 3, 2021