मुंबई : मागील अनेक दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच राज्यात ओमिक्रॉनबाधितांचेही प्रमाण वाढत आहे. तर दुसरीकडे नेतेमंडळी कोरोनाच्या विळख्यात अडकताना दिसत आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे, राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यासारख्या बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर आता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. ही माहिती खुद्द दरेकर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटद्वारे दिली आहे.
भाजप नेते प्रविण दरेकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनासदृष्य लक्षणे आढळून आल्यानंतर त्यांनी आपली चाचणी करुन घेतली. त्यांतर आता त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार त्यांनी स्वत:ला विलगीकरणात ठेवलं असून उपचार सुरु केले आहेत. माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोरोनाची लक्षणे आढळल्यास तत्काळ चाचणी करुन घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी आयसोलेशनमध्ये आहे. कृपया, माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी योग्य ती काळजी घ्यावी, थोडी जरी लक्षणे दिसत असल्यास तत्काळ कोरोना चाचणी करून घ्यावी.
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) January 5, 2022
याआधी राज्यातील अनेक बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, भाजप नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे, काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख, भाजप नेते सुजय विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे तसेच त्यांचे कुटुंबीय अशी अनेक नेतेमंडळी कोरोनाच्या विळख्यात अडकली आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. पुढील उपचारासाठी ते पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल झाले आहेत. महत्वाची बाब म्हणजे रोहित पवार 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिकही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
इतर बातम्या :
ये रिश्ता क्या कहलाता है?, रावसाहेब दानवे-अब्दुल सत्तारांची दिल्लीत गळाभेट
Nashik Corona| नाशिकमध्ये कोरोनाचा वणवा, रुग्णसंख्येचा विस्फोट झाल्याने बाधित हजारापल्याड