राज्याचे महसूल मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्रीरामपूर येथे बोलताना माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली. “ज्यांची संपूर्ण हयात फोडाफोडीत गेली त्यांच्याबद्दल बोलण्याचा प्रश्नच नाही. प्रत्येक गोष्ट ते त्याच नजरेने पाहतात. मात्र त्यांचा गैरसमज लवकरच दूर होईल. उद्याच्या विधानसभेत मोठे इन्कमिंग भाजपात राहील. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून येतीलच मात्र शरद पवारांकडे किती शिल्लक राहतील? हा प्रश्न आहे”, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर होईल, असा दावा केला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली. “तुम्हाला चार वेळा मुख्यमंत्रीपद मिळालं. तुम्ही काय परिवर्तन केलं? निम्मा बारामती तालुका आजही दुष्काळाच्या छायेत आहे. निळवंडे धरणाचं चार वेळा भूमिपूजन केलं. समन्यायी पाणी वाटपाचं भूत देखील यांच्याच काळात राज्यावर आलं. पवारांच्या दबावाखालीच थोरात यांनी त्यावेळी यावर सह्या केल्या. येणाऱ्या निवडणुकीत दूध का दूध आणि पाणी का पाणीच होणार”, असा घणाघात विखे पाटील यांनी केला.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावरही विखे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं. “नाना पटोले यांचं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न हे स्वप्नच राहील. तुम्ही सत्तेत येणार नाही तर तुम्हाला मुख्यमंत्रीपदाची काळजी करण्याचं कारणच नाही. कोण बनेगा मुख्यमंत्री? असंच काम सध्या त्यांचे सुरू आहे”, असा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला. उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला. त्यावरही विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. “सचिन वाझेला खंडणीच्या गुन्ह्यात तुमच्याच काळात अटक झाली. त्यावेळी तुम्हाला गुन्हेगार दिसले नाहीत का? खंडणी बहाद्दरांना पाठीशी घालण्याच काम कोणी केलं? व्यक्तिगत कारणातून काही गुन्ह्याच्या घटना घडत असतील. मात्र आमचे गृहमंत्री सक्षम गुन्हेगारांचा बिमोड केल्याशिवाय शांत बसणार नाहीत”, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
“महाविकास आघाडीच्या नेत्यांना आमच्या मुख्यमंत्री पदाची चिंता का लागली? आमचं सरकार येईल आणि मुख्यमंत्रीदेखील आमचाच होईल. उद्या विरोधी पक्षनेता कोण राहील याची चिंता आता तुम्ही करा”, अशी टीका विखे पाटील यांनी केली. दरम्यान, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. त्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. “बाबा सिद्दिकी यांची हत्या ही दुर्दैवी घटना आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व होतं. गेल्या आठवड्यातच मला भेटले होते. अशा घटनांमध्ये मुख्य गुन्हेगारापर्यंत पोहोचले गेले पाहिजे. फडणवीसांचा राजीनामा मागून या घटनेचं राजकारण करू नका, हीच इच्छा”, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
“हा शाहू, फुले, आंबेडकरांचाच महाराष्ट्र आहे. आम्ही सत्तेवर आलो तर बदललेली जिल्ह्यांची नावे पुन्हा पूर्ववत करू असे तुमचे नेते म्हणतात. हा दुटप्पीपणा लोकांना आता समजला आहे. औरंगजेबाच्या कबरीवर फुलांची उधळण करणं हा तुमचा शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र का? आत्मविश्वास कमी झाल्यामुळे महाविकास आघाडीची धडपड सुरु आहे. निवडणुकीनंतर यांचं अस्तित्व देखील पहायला मिळणार नाही”, अशी टीका विखे पाटील यांनी केली.