महाराष्ट्रात सहा महिन्यांपूर्वी लोकसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीचा दारुण पराभव झाला. तर महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं. या पराभवातून धडा घेत महायुतीने अनेक योजना राज्यात राबवल्या. शासन आपल्या दारी योजनेपासून लाडकी बहीण योजनेपर्यंत अशा विविध लोकोपयोगी योजना महायुती सरकारने राबवल्या. अखेर या योजनांचा महायुतीला फायदा झाला. लोकसभा निवडणुकीत जे मतदार महायुतीच्या विरोधात होते त्यांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस मतांनी जिंकून दिलं. त्यामुळे राज्यात आता महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. या सगळ्या घडामोडींनंतर राज्यात आगामी काळात महापालिका निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकीच्या आधीच जालन्यात महायुतीत राजीकीय कुस्ती होताना दिसत आहे. कारण निवडणुकीचं बिगूल वाजण्याआधीच भाजप आणि शिवसेनेच्या दोन बड्या नेत्यांनी महापौर पदावर दावा केला आहे. शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी जालन्यात महापौर शिवसेनेचाच होणार असं म्हटलं आहे. तर भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी देखील जालन्यात भाजपचाच महापौर होईल, असं म्हटलं आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर आगामी होऊ घातलेल्या महापालिकेच्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेकडूनही जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी आतापासून सुरू करण्यात आली आहे. “मी जालना महानगरपालिकेत शिवसेनेचा महापौर करणार आहे आणि तो होईल सुद्धा”, असा विश्वास माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केलाय. “महापालिका माझ्या हातात देऊन सेवा करण्याची संधी द्यावी”, असं अपील त्यांनी जनतेला केलंय. “महापालिका माझ्या विचाराच्या व्यक्तीकडे दिली तर कामाला प्रचंड गती येईल”, असं देखील खोतकर यांनी यावेळी म्हटलं. तसेच “आमच्याकडे नाव अगोदरच जाहीर करून टाकल्यामुळे रस्सीखेच होण्याचा प्रश्नच येत नाही”, असंही सूचक वक्तव्य अर्जुन खोतकर यांनी केलं आहे.
दुसरीकडे भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी देखील जालन्याच भाजपचाच महापौर होईल, असं म्हटलं आहे. त्यामुळे आगामी काळात कोणत्या पक्षाचा महापौर होईल? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, जालना महापालिका निवडणूक ही महायुतीत लढायची की स्वतंत्र लढायचं याबाबतही प्रतिक्रिया दिली आहे. “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राज्य पातळीवरील सर्वच पक्षांनी कधी कधी युतीबाबत स्थानिक पातळीवरती निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे वरच्या सूचना जशा येतील तशा सूचना पाळणाऱ्यांपैकी आम्ही आहोत. विरोधकांनी कर्नाटक आणि हरियाणाची विधानसभा निवडणूक जिंकली. लोकसभेमध्ये आमचा काही ठिकाणी पराभव झाला त्यावर त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं नाही. आता आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांची मनोधैर्य वाढवण्यासाठी ईव्हीएमवर दोष दिला जात आहे”, अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी दिली.