महायुतीची संयुक्त बैठक आज नागपुरात पार पडली. या बैठकीला भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार, शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत, शिवसेना नेते कृपाल तुमाने आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अनिकेत तटकरे उपस्थित होते. या बैठकीमधून तीनही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना समन्वय साधण्याचा आणि समन्वयाने निवडणुकीला पुढे जाण्याचा सल्ला तीनही पक्षाच्या नेत्यांनी दिल्याचे पाहायला मिळालं. यावेळी तीनही पक्षांचे मोठ्या प्रमाणात पदाधिकारी उपस्थित होते. “आपण विजयाचा संकल्प करण्यासाठी एकत्र आलो आहोत. महायुतीचा कार्यकर्ता मध्य स्थानी असलेल्या नागपुरातून विजयाचा संकल्प घेऊन जाईल. आम्हाला हा विजय हवा आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याच्या विकासासाठी महिला, भगिनींच्या विकासासाठी छत्रपतींचा संकल्प पुढे नेण्यासाठी विजय हवा आहे. महायुती हा आमच्यासाठी संगम आहे आणि संगम पवित्र असतो. तोच हा तीन पक्षाचा संगम आहे”, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
“मी कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता आहे हे बघू नका. मी महायुतीचा आहे आणि माझ्या हृदयात शिवबा असला पाहिजे. महाराष्ट्र एक नंबरचं राज्य आहे. मात्र गेल्या काही दिवसात हे राज्य बिघडविण्याची लढाई सुरू आहे. या विधासभेची ही लढाई महाराष्ट्राची नाही तर देशासाठी आहे. मात्र काही विघातक शक्ती वातावरण बिघडवण्याचं काम करत आहेत. महायुतीच्या सगळ्याच पक्षांचा आणि घटक पक्षांचा सन्मान होईल याची काळजी घ्या. कोणी कोणाला कमी समजू नका. मला विश्वास आहे की, पूर्व विदर्भातील 32 जागा जिंकण्याची आपल्यात ताकद आहे. मात्र आपण आपल्या योजना योग्य पद्धतीने पोहोचवल्या पाहिजेत”, असं आवाहन सुधीर मुनगंटीवार यांनी केलं.
“दृष्ट शक्तीने आपल्याबद्दल पासरविलेल्या अफवा दूर करायच्या आहेत. कारण लाडकी बहीण योजनेमुळे सगळ्यांच्या पोटात दुखत आहे म्हणून ते खोटं सांगून अफवा पसरवतात. ते सरड्याप्रमाणे रंग बदलतात. हे सावत्र भाऊ तुमच्या योजनेत विष घालत आहेत. हे महिलांना सांगितलं पाहिजे”, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
“घर घर तिरंगावर सुद्धा काँग्रेसचे लोक टीका करतात. दृष्ट शक्तीने जाती-जातीमध्ये द्वेष निर्माण करण्याचं काम सुरू केलं. त्यामुळे आमच्यावर जबाबदारी आहे. त्यांना योग्य काय आहे ते सांगण्याची सगळ्यांना एकत्र करण्याची जबाबदारी आहे. बाबासाहेबांना संविधान सभेत येऊ न देण्याचं काम करणारे कोण आहेत हे सांगण्याचा काम आपलं आहे. बाबासाहेबांना भारतरत्न देण्यासाठी त्यांनी किती वेळ लावला”, असं मुनगंटीवार म्हणाले.
“पक्षाने मला काय दिलं यापेक्षा मी पक्षासाठी काय केलं याचा विचार करायचा आहे. यांचं सरकार आलं तर यांचं एकच राहणार, मी याला जेलमध्ये टाकतो, त्याला जेलमध्ये टाकतो हे राहणार आहे. गद्दारीची सुरुवात कुठून झाली? जनतेने आपल्याला कौल दिला. मात्र तुमच्या मनात मुख्यमंत्री होण्याची उत्कंठा निर्माण झाली आणि तुम्ही दुसरीकडे गेलात”, असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला.
“आपण बहिणीसाठी, भावासाठी योजना आणली. आपल्या बहिणीला रक्षाबंधनाला योजनेचे पैसे मिळणार आहेत. आपली लाडकी बहीण अर्ध्या तिकीटमध्ये भावाकडे जाईल. मिठाईचा डब्बा सुद्धा नेईल. मात्र हे कॉंग्रेसवाले या बहिणींचा अपमान करत आहेत”, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली.