अमरावती | 25 ऑगस्ट 2023 : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघ भाजपचाच असल्याचं म्हटलंय. त्यामुळं सध्या भाजपसोबत असलेल्या खासदार नवनीत राणा कमळाच्या चिन्हावर लढणार का? असा प्रश्न निर्माण झालाय. सध्या भाजपसोबत असलेले आमदार बच्चू कडू यांचीही बावनकुळेंच्या एका वक्तव्यानं अडचण केलीय. पुढचे मुख्यमंत्री फडणवीसच होणार असं सांगून भाजप नेते उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही अप्रत्यक्ष इशारा देऊ पाहतायत का? असाही प्रश्न निर्माण झालाय.
भाजपच्या टार्गेटवर विरोधी पक्ष आहेतच. पण भाजप आपल्याच मित्रपक्षांनाही इशारा देतोय का? असा प्रश्न निर्माण झालाय. याचं कारण आहे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली काही वक्तव्ये. बावनकुळेंचं पहिलं वक्तव्य आहे, “2024 नंतर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असावेत अशी कार्यकर्त्यांची भावना आहे.”
“एकनाथ शिंदेंना आम्ही सोबत आणलं नाही. एकनाथ शिंदेच हिंदुत्वासाठी आमच्यासोबत आले आहेत”, असं दुसरं वक्तव्य बावनकुळे यांनी केलं. तर “अजित पवार केवळ राजकीय युती म्हणूनच भाजपसोबत आले आहेत”, असं तिसरी वक्तव्य बावनकुळे यांनी केलं आहे. बावनकुळे यांच्या वक्तव्यांची मोठी रांगच आहे.
अजित पवारांनी आज पिंपरीत भव्य रॅली काढली. हार घालून आणि पुष्पवृष्टी करुन अजित पवारांचं स्वागत झालं. स्वागतासाठी अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर लागले होते. पण बावनकुळेंनी भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच असतील, अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याचं सांगितलं.
महाशक्ती आपल्या पाठिशी उभी आहे असं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी सत्ता स्थापनेच्या काळात केलं होतं. त्याच्या बरोबर उलट वक्तव्य बावनकुळेंनी केलंय. एकनाथ शिंदेंना भाजपनं आपल्यासोबत आणलं नाही तर एकनाथ शिंदेच हिंदुत्वासाठी भाजपसोबत आल्याचं बावनकुळे म्हणतायत.
अजित पवारांशीही भाजपची केवळ राजकीय युतीच असल्याचं बावनकुळेंनी सांगितलंय. मोदींचे विचार ज्यांना पटत नव्हते त्यांनाही भाजपसोबत यावं लागलं असं वक्तव्य करुन बावनकुळेंनी खळबळ उडवून दिलीय.
भाजपचाच मित्रपक्ष असलेल्या युवा स्वाभिमान पक्षाच्या मतदारसंघावरही भाजपनं दावा केलाय. अमरावती मतदारसंघात भाजपचाच खासदार निवडून येईल असं बावनकुळेंनी सांगितलंय. देवेंद्र फडणवीसांच्या एका फोनवर गुवाहाटीला गेलेल्या बच्चू कडूंच्या मतदारसंघाबाबतही बावनकुळेंनी आश्चर्यचकित करणारं वक्तव्य केलंय. बच्चू कडूंच्या अचलपूर मतदारसंघात अनिल बोंडेंनी लक्ष घालावं असं बावनकुळे म्हणाले आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं कंबर कसलीय. जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. देशात भाजपचा मूळ विरोधक हा काँग्रेस पक्ष आहे. पण आपल्याचसोबत असलेल्या मित्रपक्षांच्या जागांवरही भाजपनं तयारी सुरु केलीय.