महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. हा निकाल काहीही लागू शकतो. पण त्याआधीच भाजपकडून विजय मिळणार असल्याचा दावा केला जातोय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या सर्व भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करुन पत्र लिहिलं आहे. त्यांनी निवडणुकीत विजयी होऊ, असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी निवडणुकीत अहोरात्र परिश्रम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे आभारही मानले आहेत. “प्रिय कार्यकर्ते बंधू- भगिनींनो, महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक १५ ऑक्टोबरला घोषित झाली. आता मतदान पार पडले आहे. उद्या शनिवारी मतमोजणी होईल. निवडणुकीच्या आधीपासून आपण साऱ्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळे मतदानाचा टक्का उंचावला आहे. लोकशाहीच्या या पवित्र उत्सवात आपण प्रत्येकाने आपापल्या क्षमतांची परिसीमा गाठून योगदान दिल्याची मला विनम्र जाणीव आहे”, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
“विश्वगौरव, युगपुरुष, आपले कुटुंबप्रमुख, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ ते २०२४ या काळात महाराष्ट्र राज्याला भरभरून मदत केली. त्यामुळे महाराष्ट्र देशातील क्रमांक १ चे राज्य होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. मोदी यांचे योगदान महाराष्ट्रात भाजप- महायुतीला पुन्हा विजयी करण्यात मोलाचे ठरणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक कुटुंब म्हणून आपण सर्वांनी अहोरात्र परिश्रम घेतले. त्यांचे आशीर्वाद आपल्याला नेहमी नवी ऊर्जा देत असतात”, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
“आपले मार्गदर्शक, देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी या निवडणुकीत स्वतःला झोकून दिले. त्यांच्या मार्गदर्शनाने आम्हाला नवी चेतना मिळाली. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा जी यांचे संघटनात्मक मार्गदर्शन आम्हाला नवी दिशा देणारे होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचाराचा झंझावात सर्व कार्यकर्त्यांना नवा उत्साह देणारा ठरला”, असं वाबनकुळे म्हणाले.
“उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, शिवराज सिंह चौहान, पियूष गोयल यांचे मार्गदर्शन, विधानसभा निवडणूक महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, सहप्रभारी अश्विनी वैष्णव यांनी नियोजनबद्ध पद्धतीने केलेले कार्य आणि त्यांची मिळालेली साथ आम्हा सर्वांना रोज नवी ऊर्जा देणारी ठरली”, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
“लाडक्या बहिणींचे देवा भाऊ आणि आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीत महाराष्ट्र पिंजून काढला. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी काम केले. त्यामुळे कार्यकर्त्यांना बळ मिळाले. मुख्यमंत्री असताना देवेंद्र यांनी २०१४ ते २०१९ या काळात केलेले कार्य आणि आताच्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये देवेंद्र यांनी बजावलेली कामगिरी आणि सर्वसामान्य जनतेसाठी घेतलेले निर्णय ऐतिहासिक स्वरूपाचे आहेत. यामुळे भाजपा- महायुतीला या निवडणुकीत बहुमत मिळेल असा मला विश्वास आहे”, असा मोठा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
“आपल्या कार्यकर्त्यांची जिद्द, इच्छाशक्ती, जनसेवेची आस यामुळेच भाजप देशात तिसऱ्यांदा सत्तेवर आहे आणि महाराष्ट्रातही भाजपा-महायुतीला पुन्हा यश मिळेल, याची मला खात्री आहे. मागील दोन वर्षात आपण सर्वांनी सोबत मिळून केलेले संघटनात्मक कार्य या निवडणुकीत आपल्याला यश नक्की मिळवून देणार आहे. देशाच्या, महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि आपण-आपल्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि भाजप-महायुतीच्या यशासाठी सुयश चिंतितो”, असं बावनकुळे आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले.