विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत भाजपकडून जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. दिल्लीत अमित शाह, जेपी नड्डांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह 12 नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत भाजपच्या सर्वच विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली जाणार नाही, असं ठरल्याचं सूत्रांची माहिती आहे. निवडून येण्याची क्षमता असलेल्या आमदारांनाच तिकीट दिलं जाईल. ज्या आमदारांची कामगिरी कमी असेल त्यांना उमेदवारी दिली जाणार नाही. पहिल्या यादीमध्ये भाजपचे सध्याचे मंत्री आणि ज्येष्ठ आमदारांच्या नावांचा समावेश असणार आहे. भाजपच्या दिल्लीतल्या कोअर कमिटीच्या बैठकीत सर्व विधानसभा मतदारसंघाविषयी चर्चा झाली. यावेळी तयारीचा आढावा घेण्यात आला. उमेदवारांच्या नावाची प्राथमिक छाननीही झालीय. बुधवारी आचारसंहिता आणि निवडणूक घोषित होण्याची शक्यता आहे. त्यानंतर बुधवारी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर पहिली यादी येण्याची शक्यता आहे.
दिल्लीत बैठक झाल्यानंतर आता महायुतीची पत्रकार परिषदही होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्र पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत महायुतीचा फॉर्म्युला समोर येणार आहे. दरम्यान, दिल्लीत पार पडलेल्या बैठकीत अमित शाह, पीयूष गोयल, भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव, जे. पी. नड्डा, आशिष शेलार, पंकजा मुंडे, मुरलीधर मोहोळ, रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस हे नेते उपस्थित होते. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्री दिल्लीसाठी रवाना होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे दिल्लीत जावून अमित शाह यांच्यासोबत चर्चा करण्याची शक्यता आहे.
महायुतीच्या गोटात जशा जोरदार घडामोडी सुरु आहेत तशाच विरोधकांमध्ये सुद्धा सुरु आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत काँग्रेसच्या गोटातही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आज दिल्लीत हायकमांडसोबत चर्चा झाल्याची माहिती आहे. या बैठकीत मुख्यमंत्री पदासाठी काम न करता महाविकास आघाडीसाठी काम करा, अशा सूचना महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मित्र पक्ष सोबत घ्या, मेरीट वरच उमेदवारी द्या, असं मत दिल्लीतल्या बैठकीत काँग्रेस हायकमांडने व्यक्त केलं आहे.