‘अजित पवारांनी जिथे तक्रार करायची तिथे करावी, पण…’, नितेश राणे यांचा निशाणा

| Updated on: Sep 19, 2024 | 9:53 PM

"अजितदादा यांना कुठे तक्रार करायची आहे ती करावी. पण आपण हिंदुत्वाशी तडजोड करणार नाही. अजित दादा यांनी विसर्जन मिरवणुकीवरील दगडफेकीचा एकदा तर निषेध करायला हवं होतं. मग अशी वेळ आली नसती", असं नितेश राणे म्हणाले.

अजित पवारांनी जिथे तक्रार करायची तिथे करावी, पण..., नितेश राणे यांचा निशाणा
नितेश राणे आणि अजित पवार
Follow us on

महायुतीचा आज बुलढाण्यात जंगी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या कार्यक्रमात अजित पवार यांनी महायुतीमधील वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नेत्यांचे कान टोचले होते. विशेष म्हणजे आमदार नितेश राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्याची अजित पवारांनी दिल्लीत भाजप पक्षश्रेष्ठांना तक्रार केल्याची चर्चा आहे. याबाबत नितेश राणे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी भूमिका मांडली. “अजितदादा यांना कुठे तक्रार करायची आहे ती करावी. पण आपण हिंदुत्वाशी तडजोड करणार नाही. अजित दादा यांनी विसर्जन मिरवणुकीवरील दगडफेकीचा एकदा तर निषेध करायला हवं होतं. मग अशी वेळ आली नसती. मी माझ्या धर्माचे काम करतोय. हिंदू म्हणून मी लढतोय”, असं नितेश राणे म्हणाले.

यावेळी नितेश राणे यांना हाजी अराफात यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता, “आमच्या दोघाचे एकच बॉस आहे. तो सागर बंगल्यावर बसला आहे. ते मला सांगत आहेत, पण हाजी अराफात यांनी भिवंडी येथील चप्पल फेकीचा निषेध करायला हवा. हिंदूचा हक्क मागणे म्हणजे दंगल नाही. आम्ही अधिकारसाठी भांडतोय. हिंदूंसाठी आम्ही गब्बर आहोत”, असं उत्तर त्यांनी दिलं. दरम्यान, महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या काँग्रेस प्रवेशावरही नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली. “संजय पांडे त्याच्याच तुकड्यावर जगणारा कुत्रा होता. मातोश्रीवर भांडी घासत होता. आता काँग्रेसमध्ये जातोय”, अशी टीका नितेश राणे यांनी केली.

नितेश राणे यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

दरम्यान, नितेश राणे यांनी सांगलीत पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं. “या लोकांना काय वाटतं की, ह्यांच्या धमक्यांना भीक देणारे आम्ही लोकं आहोत. आम्ही सांगतो, चला या पोलिसांना सांगतो की, एक दिवसाची सुट्टी देतो. तुम्ही तुमची ताकद दाखवा. हिंदू म्हणून आम्ही आमची ताकद दाखवायला मैदानात उतरतो. आम्हालाही बघायचं आहे की, त्या दिवसाच्या नंतर दुसरी सकाळ हिंदू बघतात की मुसलमान बघतात”, असं वादग्रस्त वक्तव्य नितेश राणे यांनी केलं. तसेच “विकत घ्यायचे असेल तर भाई कडून घ्या. भाईजान कडून नको. जिहादसाठी हे पैसे वापरतात. तुम्ही आर्थिक नाड्या बंद करा. जिहादसाठी पैसे येतात. ते हिंदूंकडून त्यांना येतात. त्यामुळे तुम्ही कोणाकडून खरेदी करायचे ते ठरवा”, असं नितेश राणे म्हणाले.

“हिंदू समाजाला आव्हान दिले जात आहे, कमी लेखले जात आहे. हिंदू देवतांबद्दल काहीही बोललं जात आहे. सर्व धर्म समभाव फक्त हिंदूना सांगितले जाते. हिंदू समाजाने सगळ्यांचा ठेका घेतला आहे का? हिंदू राष्ट्रात सर्व समभाव आम्हीच जपायचे का?”, असा सवाल नितेश राणे यांनी केला.