काही दिवसांपूर्वी काँग्रेसमधून भाजपात दाखल झालेले राज्यसभेचे नवोदित खासदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. इंडिया आघाडीची आज दिल्लीतील रामलीला मैदानात सभा पार पडली. या सभेला देशभरातील इंडिया आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर निशाणा साधला. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी काँग्रेसवर सडकून टीका केलीय. काँग्रेसची फरफट सुरु आहे, अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली. यावेळी अशोक चव्हाण यांनी नाव न घेता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला.
“राज्यातील विद्यमान नेतृत्वामुळे काँग्रेसची फरफट सुरू आहे. काँग्रेसच जे महत्त्व एकेकाळी होतं ते राहिलं नाही. काँग्रेसला कुणी विचारायला तयार नाही”, अशा शब्दांत खासदार अशोक चव्हाण यांनी नाव न घेता नाना पटोले यांच्यावर टीका केली. “महाविकास आघाडीतील घटक पक्षांना मान दिला जात नाही. मविआने वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचा सन्मान केला नाही. काँग्रेसच्या आधीच इतर पक्ष जागा जाहीर करत आहेत”, असं चव्हाण म्हणाले. अर्चना चाकूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावर अशोक चव्हाण यांनी ही प्रतिक्रिया दिली. मोदींच्या नेतृत्वाखाली मराठवाडाच नव्हे तर राज्यातील अनेकजण आता काम करत आहेत, असंही अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.
“अपक्ष उमेदवार देणार नाही”, अशी भूमिका मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी काल जाहीर केली. त्यांची ही भूमिका बरोबर असल्याची प्रतिक्रिया भाजपा खासदार अशोक चव्हाण यांनी दिली. त्यांची जमेची बाजू अशी आहे त्यांच्या मागे कुठल्याही पक्षाचं लेबल नाही. लोकांचा विश्वास त्यांच्यावर आहे. त्यांनी स्पष्ट केलंय की, मला राजकरणात पडायचं नाही. आपला निर्णय घेण्यास मोकळे आहात, असं पाटील म्हणाल्याचं चव्हाण बोलले. यांना पाडा असे नेमके कुणाबद्दल जरांगे पाटील बोलले नाहीत सगे सोयारेला आमचाही पाठिंबा आहे. सरकारने तसे ऑडीनंस पास केले आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले.