‘अशा गुन्हेगारांना गोळ्या घालण्यापेक्षा…’, अक्षय शिंदे एन्काउंटर घटनेवर उदयनराजे भोसले यांची प्रतिक्रिया

| Updated on: Sep 24, 2024 | 7:43 PM

बदलापूर चिमुकली मुलींवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काउंटरच्या घटनेवर भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी बेधडक प्रतिक्रिया दिली आहे. अशा गुन्हेगारांना गोळ्या घालण्यापेक्षा लोकांमध्ये सोडून तुडवून मारलं पाहिजे, असं खासदार संभाजीराजे भोसले म्हणाले आहेत.

अशा गुन्हेगारांना गोळ्या घालण्यापेक्षा..., अक्षय शिंदे एन्काउंटर घटनेवर उदयनराजे भोसले यांची प्रतिक्रिया
अक्षय शिंदे एन्काउंटर घटनेवर उदयनराजे भोसले यांची प्रतिक्रिया
Follow us on

बदलापूर घटनेतील आरोपीने केलेल्या गोळीबाराला पोलिसांनी प्रत्युत्तर दाखल केलेल्या गोळीबारात आरोपीचा मृत्यू झालाय. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत असताना साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी याबाबत आपली बेधडक भूमिका मांडली आहे. यावेळी बोलत असताना त्यांनी सत्ताधारी असो किंवा विरोधक यांच्या कुटुंबाबरोबर अशी घटना घडली असती तर त्यांनी काय केलं असतं? असा सवाल उदयनराजे यांनी केला. अशा घटनेमध्ये मी स्वतःला त्या पीडित कुटुंबाच्या जागी ठेवून व्यक्त होत असतो. गोळ्या घालून मारणं हे फार सहज झालं. यापेक्षा अशा लोकांना जनतेत सोडलं पाहिजे आणि जनतेने तुडवून अशा लोकांना मारलं पाहिजे, अशी भूमिका उदयनराजे भोसले यांनी मांडली.

उदयनराजे भोसले नेमकं काय म्हणाले?

“प्रत्येक गोष्टीकडे जर राजकारण म्हणून पाहिलं तर असेल तर या पेक्षा मोठं दुर्दैवं असूच शकत नाही. आज बदलापुरात जी काही घटना घडली, त्याअगोदरही भरपूर घटना घडल्या, त्यांचं काय झालं? मला आश्चर्य वाटतं की, लोकांना समजत कसं नाही? हेच जर आपल्या कुटुंबातील कुणाबद्दल घडलं असतं, तर त्या व्यक्तीची रिअॅक्शन काय असतं? तरीदेखील अशा लोकांचं वकीलपत्र स्वीकारलं जातं. त्यातून त्यांना निर्दोष करण्याचं सिद्ध केलं जातं. मी मागे सुद्धा माझी प्रतिक्रिया स्पष्ट केली की, अलिकडे लोकांचा न्याय व्यवस्था, पोलीस विभाग यांच्यावरील विश्वास उडाला आहे. न्याय मिळत नसेल तर लोकं तरी काय करणार? मला माहिती नाही. मी तर आता टीव्ही, बातम्या पाहणं सोडून दिलं आहे. काय करायचं ते सांगा. लोकांनी कुठे जायचं? कुठे न्याय मागायचा आणि कुणाकडे मागायचा?”, असा सवाल उदयनराजे यांनी केला.

“हे असं घडत जाणार, त्याचं कारण सांगतो. धाक आता शिल्लक राहिलेला नाही. कोणासोबतही असा प्रकार होऊ नये, अशी मी छत्रपती शिवरायांच्या चरणी प्रार्थना करतो. कुणीही असूदे, कारवाई झाली पाहिजे. महाराजांनी त्या काळात जी न्याय व्यवस्था केली त्या प्रकारची न्याय व्यवस्था झाली पाहिजे. तुमच्या कायद्यात बदल करा. काय होणार आहे? कसलाच विचार करायचा नाही. सरळ लोकांसमोर त्याला जाहीर फाशी देऊन टाका किंवा लोकांच्या ताब्यात द्या. कारण या शिवाय सुधारणा होणार नाही. समाजाला आज असुरक्षित वाटत आहे”, अशी भूमिका उदयनराजे भोसले यांनी मांडली.

आदित्य ठाकरे यांची सडकून टीका

दरम्यान, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी या घटनेवरुन सरकारवर निशाणा साधला आहे. “अक्षय शिंदेच्या हातात बेड्या होत्या की नव्हत्या? मग हा सुसाईड अटेम्पट होता की एन्काउंटर होतं? हा दुसरा प्रश्न आहे. संबंधित शाळेचा संस्थाचालक आपटे यांना वाचवायला यांचं हे एन्काउंटर झालं असेल का? हा सुद्धा तिसरा प्रश्न आहे. आमची हीच मागणी होती की हा जो नराधम होता त्याला भर चौकात फाशी दिली पाहिजे, हे सगळं न्यायप्रविष्ठ होतं. याची सुटका या माध्यमातून झाली का? हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. शाळेच्या संस्थाचालकांना अटक का झाली नाही? वामन मात्रे ज्यांनी एका महिला पत्रकाराला विचारलं होतं की तुझ्यावर रेप झाला आहे का? त्यांना अटक का झाली नाही?”, असे सवाल आदित्य ठाकरे यांनी केले आहेत.

“ज्या पोलीस स्टेशनमध्ये एका गरोदर महिला सात दिवस बसून ठेवलं, त्याच्यानंतर उद्रेक झाला आणि तिथे आंदोलकांवर जसे ते गॅंगस्टर आहेत अशाप्रकारे त्यांना बेड्या ठोकल्या. त्यांच्यावरील गुन्हे मागे कधी घेणार? संस्थाचालक आपटे भाजपच्या जवळचे आहेत का? ठाणे पोलीस आयुक्त काय करत होते, सात दिवस गुन्हा दाखल करून घेतला नाही आणि जे आंदोलन करतात त्यांच्यावर 15 मिनिटात गुन्हा दाखल करून घेतला? आंदोलन कर्त्यांवरचा गुन्हा कधी मागे घेणार? एन्काउंटर बद्दल लोकांसमोर सत्य येणे गरजेचे आहे. संस्थाचालकाची चौकशी झाली पाहिजे, आम्ही पहिल्यापासून मागणी करत आहोत. त्याच्यासोबत काय झालं त्या गाडीमध्ये हे कोणालाच माहिती नाही”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.