भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा राजकीय वनवास अखेर संपताना दिसतोय. लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांना विधान परिषद किंवा राज्यसभेत घ्यावं, अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून केली जात होती. अखेर पंकजा मुंडे यांची ही मागणी भाजपने मान्य केली आहे. पंकजा मुंडे यांचा गेल्या 5 वर्षांपासून राजकीय वनवास सुरु होता. पंकजा यांनी वारंवार आपली नाराजी व्यक्त देखील करुन दाखवली होती. पण लोकसभा निवडणुकीत त्यांना भाजप पक्षाकडून खासदारकीचं तिकीट देण्यात आलं. या माध्यमातून भाजप पंकजा यांना देशाच्या राजकारणात सक्रीय करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत होती. पण लोकसभेत पराभव झाल्याने पंकजा यांचं काय होणार? याबाबत चर्चा सुरु होत्या. राज्यात दुसरीकडे ओबीसी आणि मराठा आरक्षणासाठी ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा मोठा फटका महायुतीला लोकसभेत बसला. अशा परिस्थितीत आगामी विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाजाचा पाठिंबा मिळावा या हेतूने भाजपने पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतलाय. या निमित्ताने पंकजा मुंडे यांचं राज्याच्या राजकारणात पुनर्वसन होत आहे.
भाजप एकीकडे पंकजा मुंडे यांना राज्याच्या राजकारणात सक्रिय करत आहे. पण दुसरीकडे भाजपचे राज्यातील ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांचं काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. विशेष म्हणजे रासप नेते महादेव जानकर यांच्याबद्दलही तसाच प्रश्न उपस्थित होतोय. महादेव जानकर यांच्यासाठी महायुतीने लोकसभेच्यावेळी परभणीची जागा दिली होती. पण यावेळी भाजपने महादेव जानकर यांना संधी दिलेली नाही. विशेष म्हणजे भाजपने आपल्याला एक राज्यसभा आणि विधान परिषदेची जागा देण्याचं कबूल केलं होतं, असा दावा महादेव जानकर यांनी नुकताच केला होता. पण विधान परिषदेच्या 5 जागांपैकी एकाही जागेवर महादेव जानकर यांना पुन्हा संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे आता महादेव जानकर हे महायुतीपासून लांब जात आहेत का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
भाजपने विधान परिषदेसाठी 5 नेत्यांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये पंकजा मुंडे यांचं पहिलं नाव आहे. यानंतर योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोखले यांची नावे आहेत. या यादीत पाचवं नाव हे महायुतीचे घटक पक्षाचे नेते सदाभाऊ खोत यांचं आहे. भाजपकडे विधान परिषदेत 5 आमदार निवडून येतील इतकं संख्याबळ आहे. महादेव जानकर यांची जागा सदाभाऊ खोत यांना देण्यात आली आहे. सदाभाऊ खोत एक शेतकरी चेहरा आहे. तसेच महायुतीला त्यांचा फायदा व्हावा, या विचारातून त्यांना विधान परिषदेवर घेण्यात येत आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपने आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून या पाच नावांची निवड केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत अंतर्गत फटका बसू नये म्हणून भाजपने ही रणनीती आखली आहे. विशेष म्हणजे विधान परिषदेसाठी ज्या नावांची निवड केली आहे त्यामध्ये जातीय समीकरणाचा विचार करण्यात आला आहे. तसेच मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या तीनही भागांचा विचार करण्यात आला आहे. या सर्व भागांमध्ये लोकसभेत भाजपला मोठा झटका बसला आहे. तसेच जातीय समीकरण पाहण्यात आलं आहे.
रावसाहेब दानवे हे महाराष्ट्रातील भाजपचे दिग्गज नेते आहेत. ते एकेकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष देखील होते. तसेच ते लोकसभा निवडणुकीआधी देशाचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्रीदेखील होते. रावसाहेब दानवे यांचा राजकीय प्रवास हा एक तप आहे. त्यांनी 1980 पासून राजकीय प्रवासाला सुरुवात केली. त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीपासून विधानसभा निवडणूक आणि पुढे लोकसभा निवडणूक असा प्रवास केला. ते दोन वेळा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले. त्यानंतर ते सातत्याने चार वेळा लोकसभा निवडणुकीत केंद्रात जिंकून गेले. पण 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मराठा आरक्षणाचा फटका तसेच राज्याती काही राजकीय घडामोडी त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरली. या पराभवानंतर रावसाहेब दानवे यांना राज्याच्या राजकारणात सक्रीय केलं जाईल, अशी चर्चा होती. पण भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी त्यांना राज्यात पाठवलेलं नाही. याऐवजी त्यांना राज्यसभेवर घेतलं जाण्याची शक्यता आहे. याबाबत आगामी काळात काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.
दरम्यान, पंकजा मुंडेंना भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर परळीत मुंडे समर्थकांनी जल्लोष केला. परळीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात समस्त मुंडे समर्थकांनी एकत्र येत पंकजा मुंडे यांच्या नावाने घोषणाबाजी करत हा आनंदोत्सव साजरा केला. एकमेकांना पेढे भरवून आणि फटाके फोडत हा जल्लोष साजरा होत आहे. लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा निसटता पराभव झाला. या पराभवानंतर मुंडे समर्थकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळाला होता. मात्र अखेर भाजपकडून पंकजा मुंडे यांना विधान परिषदेत संधी देण्यात आली आहे. याची अधिकृत घोषणा आज करण्यात आली. पंकजा मुंडेंच्या या निवडीनंतर मुंडे समर्थकांमध्ये उत्साह दिसून येतोय. पंकजा मुंडेंच्या विधान परिषदेच्या संधी नंतर नेमके जिल्ह्यातील राजकीय समीकरण कसे बदलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.