भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव हटवण्यात आलं आहे. शरद पवार गटाने आक्षेप घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने भाजपला पत्र पाठवून उत्तर मागितलं होतं. त्यानंतर भाजपने हा मोठा निर्णय घेतला आहे. एखादा राजकीय पक्ष इतर पक्षांच्या नेत्यांची नावे आपल्या स्टार प्रचारकांच्या यादीत घेऊ शकत नसल्याचं निवडणूक आयोगाने या पत्रात म्हटलं होतं. त्यानंतर भाजपने या हा निर्णय घेतला.
भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील 40 स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाला दिली होती. यावेळी भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी निवडणूक आयोगाला एक पत्रही दिलं होतं. जोपर्यंत आम्ही सुधारीत यादी पाठवत नाही, तोपर्यंत ही यादी महाराष्ट्रासाठी चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील निवडणुकांसाठी वैध मानली जाऊ शकते, असं अरुण सिंह यांनी पत्रात म्हटलं होतं.
शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीने शिंदे गट आणि भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीवर आक्षेप घेतला होता. पवार गटाने निवडणूक आयोगाकडे त्याबाबत तक्रार केली होती. लोकप्रतिनिधी अधिनियमाच्या कलम 77 चं हे उल्लंघन असल्याचं पवार गटाने म्हटलं होतं. दोन्ही राजकीय पक्षांनी स्टार प्रचारकांच्या यादीत इतर नेत्यांचा समावेश केला आहे. शिंदे गटाने आपल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा समावेश आहे, असंही पवार गटाने म्हटलं होतं.
यापूर्वी 26 मार्च रोजी भाजपने 40 स्टार प्रचारकांची यादी दिली होती. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नावाचा समावेश होता. त्यानंतर 5 एप्रिल रोजी निवडणूक याओगाने भाजपला पत्र लिहिलं होतं. इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांची नावे आपल्या पक्षाच्या यादीत घेऊ नका. ते कायद्याचं उल्लंघन आहे. पक्ष सदस्यांचीच नावे स्टारप्रचारकांच्या यादीत असले पाहिजे, असं आयोगाने या पत्रात म्हटलं होतं.