चक्क बैलगाडीवरुन स्वार होत, खासदार उदयनराजे भोसले यांनी उमेदवारी अर्ज भरण्याआधी रॅली काढली. या रॅलीच्या माध्यमातून उदयनराजेंनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. साताऱ्याच्या राजवाड्यातूनच बैलगाडीतून उदयनराजे निघाले. विशेष म्हणजे राजकीय वाद बाजूला ठेवत उदयनराजेंसोबत शिवेंद्रराजेही होते. बैलगाडीचा एक कासरा उदयनराजेंच्या हाती आणि दुसरा कासरा शिवेंद्रराजेंनी घेतला. गांधी मैदानापर्यंत बैलगाडीतून आल्यानंतर रथातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली निघाली. तर पोवाई नाक्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही रॅलीत सहभागी झाले.
उदयनराजेंची लढत शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदेशी आहे आणि उदयनराजेंनी शशिकांत शिंदेंच्या वाशीतल्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केलाय. या गुन्ह्याची नोंद शिंदेंनी उमेदवारी अर्जाच्या प्रतिज्ञापत्रात सादर केल्याचं सांगत आता शरद पवार हा घोटाळा दाबण्यासाठी 4-4 सभा साताऱ्यात घेणार का? अशी टीका उदयनराजेंनी केलीय.
साताऱ्यात उदयनराजेंसह सांगलीत भाजपचे उमेदवार संजय काका पाटलांनी बाईक रॅली काढून शक्तिप्रदर्शन करत अर्ज भरला. रायगडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरेंनी अर्ज दाखल केला. तर सोलापुरात काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदेंनी अर्ज केलाय. प्रणिती शिंदेंचा अर्ज दाखल करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही हजर होते.
काँग्रेस भवनासमोर जाहीर सभेनंतर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढत प्रणिती शिंदेंनीही शक्तिप्रदर्शन केलं. भाजपला मत म्हणजे संविधान, शेतकरी विरोधातला मत, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या आहेत. सोलापुरात प्रणिती शिंदे आणि भाजपच्या राम सातपुतेंमध्ये फाईट आहे. सातपुतेंनीही आक्रमक प्रचार सुरु केलाय. दोघेही आमदार आहेत. यापैकी खासदारकीसाठी एकाचा फैसला सोलापूर लोकसभेची जनता 7 मे रोजी घेणार आहेत.