मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. काल उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये एक सभा घेतली. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची एक जुनी ऑडिओ क्लिप ऐकवली. त्यात फडणवीस हे एकवेळ भाजप सत्तेत राहणार नाही, पण राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करणार नाही, असं म्हणत आहेत. ही क्लिप ऐकवल्यानंतर “अरे काय तुमच्या नागपूरला कलंक आहे हा” असे शब्द देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल वापरले.
उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेली ही टीका भाजपा नेत्यांना चांगलीच जिव्हारी लागली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला.
‘तुम्ही किती कर्तृत्वशून्य आहात हे लोकांनी अनुभवलं’
“उद्धव ठाकरे म्हणजे हिंदुत्वाला आणि महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. जो स्वतःच्या वडिलांच्या विचारांचा पाईक होऊ शकला नाही तो काय महाराष्ट्राच्या गप्पा मारणार आहे. आमचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस यांचे काय कर्तृत्व आहे हे महाराष्ट्रातील जनतेनं अनुभवलं आहे. आणि तुम्ही किती कर्तृत्वशून्य आहात हे देखील तुमच्या सत्तेच्या अडीच वर्षांत लोकांनी अनुभवलं आहे” अशी खोचक टीका केली.
‘तुम्ही १०० कोटीची वसुली केली’
“उद्धव ठाकरे तुम्ही 2019 साली गद्दारी करून सत्ता मिळवली. सत्तेच्या अडीच वर्षांत तुम्ही कुणाच्या खांद्यावर कुणाचं ओझं तुम्ही वाहिलं हेही महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलं. तुम्ही तुमच्या मुख्यमंत्रिपदाचं आणि मुलाच्या मंत्रिपदाचं ओझं सामान्य शिवसैनिकांच्या खांद्यावर दिलं. घरात बसून फुकाच्या गप्पा मारत तुम्ही १०० कोटीची वसुली केली आणि महाराष्ट्र कलंकित केला. त्यामुळे महाराष्ट्राला लागलेला खरा कलंक म्हणजे उद्धव ठाकरे आहेत” असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
‘देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र भूषण’
“उद्धव जी, तुमच्याबद्दल शिल्लक असलेला आदरसुद्धा आता संपला आहे. आमचे नेते हे कलंक नाहीत तर महाराष्ट्र भूषण आहेत. उद्धवजी तुमचे मानसिक संतुलन बिघडले आहे. आपण काय बोलत आहोत, याचे भान तुम्हाला राहत नाही. भाजपा नेत्यांना उद्देशून तुम्ही ‘ मर्दाची औलाद असाल तर‘ असे विधान केले. अशी भाषा एखाद्या गावगुंडाची असते” असे बोचरे शब्द बावनकुळे यांनी वापरले.
उद्धव जी, तुमच्याबद्दल शिल्लक असलेला आदरसुद्धा आता संपला आहे.
आमचे नेते @Dev_Fadnavis हे कलंक नाहीत तर महाराष्ट्र भूषण आहेत.
उद्धवजी तुमचे मानसिक संतुलन बिघडले आहे. आपण काय बोलत आहोत, याचे भान तुम्हाला राहत नाही. भाजपा नेत्यांना उद्देशून तुम्ही ‘ मर्दाची औलाद असाल तर‘ असे…
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) July 10, 2023
‘तुमचे लाड केले’
“उद्धवजी, आमचे नेते देवेंद्र जी मुख्यमंत्री असताना त्यांनी तुम्हाला अनेकदा सांभाळून घेतले. तुमचे आणि तुमच्या लहान मुलाचे अक्षरशः लाड केले. त्यांनी कधी भेदभाव केला नाही. त्यांचे मन पवित्र आहे. त्यांच्यावर तुम्ही कितीही टीका केली तरीही ते विचलित होणार नाहीत. मदत करण्याचा त्यांचा स्वभाव कायम आहे आणि राहील देखील”
“उद्धवजी, तुम्हीच कलंकित आहात. तुम्ही आमच्या पाठीत खंजीर खुपसला. हिंदुत्व गुंडाळून ठेवले. तुम्ही अहंकारी आहात. छोट्या मनाचे आहात. तुमची कीव येते. राजकीय मतभेद असतात पण अशी भाषा कुठलाही राजकीय विरोधक करीत नसतो. देवेंद्रजी सारख्या देव माणसावर अशी विकृत टीका करून तुम्ही तुमच्याबद्दल असलेला थोडाबहुत आदर सुद्धा आता संपवून टाकला आहे” असं बावकुळे यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.