मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल एका सभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूरचा कलंक म्हटलं होतं. त्यांच्या या विधानाचे संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटत आहेत. आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर असताना आणि आताही त्यांच्या कार्यकाळात कशी चांगली काम होतायत? त्याची यादीच वाचून दाखवली.
दुसऱ्याबाजूला उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर असताना महाराष्ट्राची कशी अधोगती झाली? चांगल्या योजना कशा बंद पडल्या? त्याचे दाखले दिले.
‘जनतेशी बेईमानी करुन मुख्यमंत्रीपदापर्यंतचा अयशस्वी प्रवास’
“देवेंद्र फडणवीस यांनी जिद्द, मेहनत आणि सातत्य याच्या बळावर नगरसेवक ते मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या राजकारणात उच्चपदापर्यंत यशस्वी प्रवास केला. तेच उद्धव ठाकरे यांनी स्वत:च्या नेतृत्वाला कर्तुत्व समजून जनतेशी बेईमानी करुन मुख्यमंत्रीपदापर्यंतचा अयशस्वी प्रवास केला” अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
अंधारात लोटण्याच कलंकित काम कोणी केलं?
“महाराष्ट्रातील जनतेला दुष्काळमुक्त करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवारसारखी योजना सुरु केली. तेच उद्धव ठाकरे यांनी स्वत:च्या अहंकारासाठी जलयुक्त शिवार योजना बंद पाडली. कोरोनाच्या काळात महाराष्ट्राला अंधारात लोटण्याच कलंकित काम उद्धव ठाकरे यांनी केलं” असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
मेट्रो बंद पाडणारा नेता म्हणजे उद्धव ठाकरे
“देशातील सर्वात मोठं मेट्रोच नेटवर्क, जाळं देवेंद्र फडणवीस यांनी उभारलं. महाराष्ट्र मेट्रोच्या जाळ्यात नंबर एक आहे. ही देवेंद्र फडणवीस यांची दूरदृष्टी आहे. तेच कमिशन भेटत नाही, म्हणून मेट्रो बंद पाडणारा नेता म्हणजे उद्धव ठाकरे” असं घणाघाती टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
जोडेमारो आंदोलन करणार
देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल महाराष्ट्रात जिथे-जिथे बोलाल, तिथे उद्धव ठाकरे यांच्याविरोधात जोडेमारो आंदोलन करणार असं बावनकुळे यांनी सांगितलं. “मराठा समाजाला आरक्षण देणारे, त्यासाठी डेटा तयार करणारे हायकोर्ट, सुप्रीम कोर्टापर्यंत आरक्षण टिकवणारे यशस्वी मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस. तेच मराठा समाजाच, ओबीसींच आरक्षण घालवणारा कलंकित माणून म्हणजे उद्धव ठाकरे” अशी बोचरी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
“मराठवाड्याची वॉटर ग्रीड योजना उद्धव ठाकरे यांनी बंद पाडली. स्वांतत्र्य वीर सावकरांचा अपमान काँग्रेस करत होती. त्यावेळी त्यांच्यासोबत असलेला कलंकित करंटा कोण? उद्धव ठाकरे” अशी बोचरी टीका बावनकुळे यांनी केली.