राज्यातील लोकसभा निवडणूक महायुतीने एकत्रित लढवल्या. परंतु या निवडणुकीत महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांना झटका बसला. भाजपच्या पराभवासंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून अजित पवार यांच्या पक्षाला जबाबदार धरले जात आहे. संघाने अजित पवार यांना सोबत घेण्याची गरज होती का? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच महायुतीत अजित पवार यांना एकटे पाडण्याचे प्रयत्न सुरु असल्याची चर्चा रंगली आहे. त्याचवेळी विधान परिषद निवडणुकीत भाजपने अजित पवार यांना झटका दिला आहे. अजित पवार यांच्या पक्षाऐवजी शिवसेनेच्या उमेदवारास भाजपने पाठिंबा दिला आहे.
नाशिकमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपने आणखी एक झटका दिला आहे. नाशिक शिक्षक मतदार संघात भाजपकडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. यामुळे अजित पवार यांना महायुतीत एकटे पाडण्याचा डाव असल्याची चर्चा रंगली आहे. अजित पवार गटाकडून नाशिकमधून छगन भुजबळ तर जळगावमधून मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्यावर अजित पवार गटाचा उमेदवाराची जबाबदारी दिली आहे.
नाशिक शिक्षक मतदार संघात महेंद्र भावसार हे अजित पवार यांच्या पक्षाचे उमेदवार आहेत. तर किशोर दराडे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत. भाजपने मात्र शिंदे यांच्या उमेदवाराला पाठिंबा आहे. नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन आणि विजय चौधरी यांना शिक्षक मतदार संघात प्रभारी म्हणून जबाबदारी दिली आहे. त्यांनी शिंदेंच्या सेनेचे उमेदवार किशोर दराडे हेच महायुतीचे उमेदवार असा उल्लेख केला. त्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला महायुतीत एकटे पाडले जात असल्याची चर्चा रंगली आहे.
नाशिक विभाग शिक्षक मतदार संघात भाजपने शिंदे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार महेंद्र भावसार यांनी सांगितले की, राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून एबी फॉर्म घेऊन मी माझी उमेदवारी दाखल केली आहे. वेगवेगळ्या पक्षांची पाठिंब्याची पत्र निघत आहे. ही मैत्रीपूर्ण लढत आहे. मात्र कुठल्या दबावाने पाठिंबाचे पत्र काढले जात आहे, हा एक गंभीर विषय आहे.पत्रक काढणे आणि छुपा पाठिंबा तळागाळातील कार्यकर्त्यांनी काम करणे यात मोठा फरक आहे. समोरच्या उमेदवारांना पराभव दिसत असल्याने अशी वेगवेगळी पत्र गोळा केली जात आहे.
ठाकरे गटाचे शिक्षक मतदार संघाचे उमेदवार संदीप गुळवे यांनी नरहरी झिरवाळ यांची भेट घेतली. त्यानंतर राजकारणात लेखी नाही तर तोंडी पाठिंबा देता येतो, अशी प्रतिक्रिया नरहरी झिरवाळ यांनी दिली. राजकारणात पाठिंबा मागितलाच तर लेखी नाही तोंडी देता येईल. मी त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजे हा मानवता धर्म आहे.
त्यांनी मला शुभेच्छा दिल्या मी त्यांना शुभेच्छा दिल्या, असे झिरवाळ यांनी म्हटले आहे.