युद्धपातळीवर महायुतीचा जागावाटपाचा प्रश्न सुटणार, लगेच 7 तारखेला उमेदवारांची घोषणा, सूत्रांकडून मोठी बातमी

| Updated on: Mar 05, 2024 | 9:56 PM

महायुतीच्या जागावाटपाचा तिढा लवकरच संपण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हा तिढा संपवण्यासाठीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. महायुतीमधील तीनही प्रमुख पक्षांचा वेगवेगळा जागांवर दावा केला जातोय. त्यामुळे अनेक जागांवर तिढा निर्माण झाला आहे.

युद्धपातळीवर महायुतीचा जागावाटपाचा प्रश्न सुटणार, लगेच 7 तारखेला उमेदवारांची घोषणा, सूत्रांकडून मोठी बातमी
mahayuti
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

विनायक डावरुंग, Tv9 प्रतिनिधी, मुंबई | 5 मार्च 2024 : महायुतीच्या जागावाटपाबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्राच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते महायुतीच्या सर्व प्रमुख नेत्यांसोबत चर्चा करुन युद्ध पातळीवर जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारींची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत 195 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. पण यामध्ये महाराष्ट्रातील एकाही मतदारसंघाचा समावेश नव्हता. त्यानंतर आता येत्या 7 मार्चला भाजपकडून दुसरी यादी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या यादीत महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघ आणि उमेदवारांची यादी जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अमित शाह आज रात्री आणि उद्या दिवसभरात महायुतीच्या प्रमुख नेत्यांबरोबर चर्चा करणार आहेत. त्यानंतर उद्या संध्याकाळी दिल्लीत भाजप निवडणूक समितीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर 7 तारखेला भाजपची दुसरी यादी जाहीर होण्याची दाट शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महायुतीच्या जागावाटपाचा तिढा लवकरच संपण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हा तिढा संपवण्यासाठीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. महायुतीमधील तीनही प्रमुख पक्षांचा वेगवेगळा जागांवर दावा केला जातोय. त्यामुळे अनेक जागांवर तिढा निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला आधी शिंदे गटाला मिळतील तितक्याच जागा आपल्यालाही हव्यात, असा दावा होता. विशेष म्हणजे अजित पवार गट 17 जागांवर ठाम आहे. त्यापैकी 10 जागांसाठी अजित पवार गट आग्रही असल्याची माहिती मिळत आहे. दुसरीकडे शिंदे गटाचा 23 जागांवर दावा आहे.

अजित पवार गटाचा भाजप आणि शिवसेनेच्या ‘या’ जागांवर दावा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार गटाकडून भाजपाजवळील गडचिरोली, माढा जागेसाठी आग्रह केला जातोय. तसेच शिवसेनेचे खासदार असलेल्या धाराशिव, परभणी जागेवरही अजित पवार गटाचा दावा आहे. दुसरीकडे शरद पवार गटाकडून अजित पवार गटाला फक्त 4 जागा मिळतील, असा दावा केला जातोय. कारण राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे खासदार मिळून फक्त चार खासदार आहेत. त्यामुळे रायगड, बारामती, सातारा, शिरुर इतक्या चार जागाच अजित पवार गटाला मिळू शकतात, असा दावा शरद पवार गटाकडून केला जातोय.

हेही वाचा : रात्र महत्त्वाची, खलबतं होणार, थोडी खुशी थोडा गम, महायुतीच्या जागावाटपावर उद्याच शिक्कामोर्तब

अजित पवार अमित शाहांशी सविस्तर चर्चा करणार

दरम्यान, अजित पवार गटात जोरदार बैठकांचं सत्र पार पडत आहे. लोकसभा निवडणुकीत आपल्याला कोणकोणत्या जागा मिळाव्यात? या मुद्द्यावर अजित पवार गटातील प्रमुख नेत्यांची आज बैठक पार पडली आहे. त्यानंतर आज रात्री अजित पवार यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत महत्त्वाची बैठक पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत अजित पवार कोणकोणत्या जागांसाठी इच्छूक असल्याची माहिती अमित शाह यांना देणार आहेत. या बैठकीत अंतिम जागावाटप ठरण्याची शक्यता आहे.