कोल्हापूर | 9 मार्च 2024 : कोल्हापूर लोकसभेसाठी महायुतीचा नवा राजकीय डाव समोर येताना दिसत आहे. महाविकास आघाडीकडून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी छत्रपती घराण्याचे कोल्हापूर गादीचे वंशज शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे कोल्हापुरात महाविकास आघाडीचं पारडं जड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण कोल्हापूरच्या जागेवर भाजप मोठी राजकीय खेळी खेळण्याचे संकेत मिळत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप कोल्हापूरच्या जागेवर शाहू महाराजांच्या विरोधात राजर्षी शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचे वंशज समरजित घाटगे यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत आहे. भाजपच्या वरिष्ठ पातळीवर घाटगेंच्या उमेदवारीचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे भाजपची ही मोठी राजकीय खेळी असल्याचं मानलं जात आहे.
भाजप कोल्हापुरात मविआचे उमेदवार शाहू महाराज यांना टक्कर देण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे थेट वंशज समरजित घाटगे यांना निवडणुकीच्या रणांगणात उतरवण्याची शक्यता आहे. राजर्षी शाहू महाराज हे कालगच्या घाटगे घराण्यातून कोल्हापूरच्या गादीवर दत्तक म्हणून आले आहेत. याचाच अर्थ कागलचे घाटके घराणं हे शाहू महाराजांचं जनक घराणे आहे. या घराण्याचे समरजित घाटगे हे थेट वंशज आहे. समरजित घाटगे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. घाटगे यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलं आहे. त्यामुळे त्यांचं कोल्हापूर जिल्ह्यात चांगलं नेटवर्क आहे. कोल्हापूरच्या ग्रामीण भागात भाजप पक्षाचं काम पोहोचवण्यात घाटगे यांचा मोठा वाटा आहे. घाटगे यांना उमेदवारी दिल्यास कागलसह अनेक विधानसभा मतदारसंघात महायुतीमधील मित्रपक्षांचा तिढा सुटणार आहे.
समरजित घाटगे यांच्या संभाव्य उमेदवारीबाबत मंत्री हसन मुश्रीफ यांनी भूमिका स्पष्ट केली. “तीनही पक्ष मिळून उमेदवाराबाबत जो निर्णय घेतील त्याच्यामागे आम्ही ठामपणे उभं राहणार आहेत. दिलेल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी हाडाचं काडं आणि रक्ताचं पाणी करेन. कोण उमेदवार दिला जाणार याबाबत मला माहिती नाही. मात्र जो उमेदवार देतील त्याचा मला प्रचार आणि नेतृत्व करावं लागेल. दुसरं काही करण्याचा आमचा स्वभाव नाही”, अशी प्रतिक्रिया मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनीदेखील याबाबत प्रतिक्रिया दिली. “आमचे धोरण पक्के आहे. सक्षम उमेदवार देणे आणि निवडून आणणे हे आमचे धोरण आहे”, असं सतेज पाटील म्हणाले. दरम्यान, शाहू महाराजांची मविआकडून उमेदवारी पक्की असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्यांचे पुत्र संभाजीराजे यांनी आपण लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलंय. यामुळे सतेज पाटील यांनी संभाजीराजे यांचे आभार मानले आहेत. “संभाजीराजे यांचं मनःपूर्वक धन्यवाद. त्यांनी घर म्हणून त्यांची जबाबदारी होती आणि तसाच स्तुत्य निर्णय घेतला आहे. आम्ही त्यांना सुद्धा वारंवार विनंती केली होती की शाहू महाराजांनी ही निवडणूक लढावी. हे पुरोगामी विचार दिल्लीपर्यंत जावेत हा आमचा प्रयत्न आहे. शाहू महाराजांवर टीका करणाऱ्यांवर त्यांच्या बुद्दीची कीव येते. वैयक्तिक टीका करणाऱ्यांना मतदार योग्य उत्तर देतील. महाविकास आघाडी म्हणून आम्ही ताकदीने सामोरे जाऊ”, अशी प्रतिक्रिया सतेज पाटील यांनी दिली.