सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे, राज्यातील दिग्गज नेत्यांचं भवितव्य ईव्हीएममध्ये कैद झालं आहे. एक्झिट पोलनुसार राज्यात कुठल्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाहीये, त्यामुळेच निवडणूक निकालापूर्वीच सत्तास्थापनेसाठी आवश्यक असणाऱ्या आमदारांचा आकडा कसा जुळवता येईल? याबाबतच्या हालचाली महायुती आणि महाविकास आघाडीच्या गोटातून सुरू झाल्या आहेत. अपक्ष उमेदवारांना संर्पक साधण्यात येत आहे. मात्र याबाबत बोलताना आम्हाला राज्यात स्पष्ट बहुमत मिळेल, त्यामुळे आम्हाला अपक्ष आमदारांची गरज लागणार नाही, असं वक्तव्य भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केलं आहे.
नेमकं काय म्हणाले दानवे?
लोकसभेत काँग्रेसनं एक नरेटीव सेट केला त्यामुळे आम्हाला भोगावं लागलं. मात्र यावेळी ते यशस्वी झाले नाहीत. यावेळी परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे राज्यात महायुतीचं सरकार बहुमतानं येणार. आम्ही सरकार स्थापन करणार. बहुमत मिळत असेल तर अपक्ष आमदारांना संपर्क साधण्याची गरज काय? आम्ही बहुमतात येत असल्यानं बंडखोरांशी चर्चा करण्याची गरज नाही. बंडखोर हा विषय सत्ता स्थापन झाल्यानंतरचा आहे. बंडखोर अपक्ष असेल आणि त्याला जर महायुतीला पाठिंबा द्यायचा असेल तर आम्ही त्यांचे स्वागत करू, असं दानवे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांना गांभीर्यानं घेण्याची गरज नाही. वाढलेल्या मतदानाचा टक्का महिलांचा आहे. लाडकी बहिण आमच्या पाठीशी आहे. भारतीय जनता पार्टीला कुठेही नुकसान नाही. लोकसभेला जी परिस्थिती होती ती आता सुधारली आहे. एकनाथ शिंदे हे पूर्णपणे भाजप आणि मित्र पक्षांच्या सोबत आहेत. त्यामुळे कार्यकर्ते काहीही बोलले तरी त्याला काही अर्थ नाही. जो मुख्यमंत्री यांचा निर्णय तोच कार्यकर्त्यांचा निर्णय असेल, महायुती पूर्णपणे बहुमतात येऊन सरकार स्थापन करेल जर अपक्ष आमदाराला पाठिंबा द्यायचा असेल तर ते देऊ शकतात, असंही यावेळी दानवे यांनी म्हटलं आहे.