शिवसेना- काँग्रेस आणि राष्ट्रवादी, या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीला नागपूर आणि अकोल्यात भाजपनं पराभूत केलंय. नागपुरात भाजपकडे विजयाचं संख्याबळ होतं. तरीही तिथं महाविकास आघाडीची मतं फुटली आणि अकोल्यातही संख्याबळ नसतानाही, सलग 3 वेळा आमदार राहिलेल्या शिवसेनेच्या गोपीकिशन बाजोरिया यांचा भाजपच्या खंडेलवाल यांनी पराभव केला. हा पराभव झाला, महाविकास आघाडीचीच मतं फोडून, नागपुरात महाविकास आघाडीची 44 मतं फुटली. तर अकोला-वाशिम आणि बुलडाणा मतदार संघात महाविकास आघाडीची तब्बल 197 मतं फुटली.
आजच्या विजयानंतर भाजपचं खुलं आव्हान
आता महाविकास आघाडीनंच भक्कम एकजूट न दाखवल्यानं, भाजपचा मार्ग सोपा झाला. त्यामुळं महाविकास आघाडी म्हणजे निवडणुकीत विजयच हे समीकरण विधान परिषदेच्या निवडणुकीत चुकीचं ठरलंय. ही निवडणूक जनतेतून थेटपणे झालेली नसली. तरी महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधीच आपल्या अधिकृत उमेदवारांच्या पाठीशी राहिले नाहीत. उलट भाजपच्या उमेदवाराला विरोधकांची मतं पडली. महाविकास आघाडीला धक्का देत, भाजपनं विजय मिळवताच, भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी सरकारला आव्हान दिलंय. विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त पद्धतीनं घ्या, मग अध्यक्ष कोणाचा होतो ते कळेल, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.
नागपूर आणि अकोला या विदर्भातल्या दोन्ही जागांवर महाविकास आघाडी पराभूत झालीय. 3 पक्ष एकत्र असताना, मविआचं संख्याबळ अधिक असताना अकोल्यात भाजपचा विजय ही भाजपची मोठी कामगिरी आहे. आणि महाविकास आघाडीला हा मोठा धक्का आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आगामी काळात हे डॅमेज कंट्रोल कसे रोखणार? हेही पाहणं तितकचं महत्वाचं ठरणार आहे. कारण सध्या तरी भाजपने करेक्ट कार्यक्रम केल्याचे दिसून येत आहे.