कुणाल जायकर, टीव्ही 9 मराठी, अहमदनगर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह बरळणारा अहमदनगरचा माजी उपमहापौर आणि भाजपचा माजी नेता असलेल्या श्रीपाद छिंदम याच्याविरोधात भाजपकडून उमेदवारच नाही. छिंदम अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे. श्रीपाद छिंदमला भाजप एकप्रकारे पाठिंबा देत आहे की काय, अशी शंका घेण्यास आता वाव आहे.
काही दिवसांवर अहमदनगर महापालिकेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीत अहमदनगरचा माजी उपमहापौर आणि भाजपने हकालपट्टी केलेला नेता श्रीपाद छिंदम अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे. शिवरायांबद्दल आक्षेपार्ह बरळल्याने भाजपने त्याची पक्षातून हकालपट्टी केली खरी, पण त्याच्याविरोधात आता भाजपचा उमेदवारच नसल्याचे चित्र आहे.
छिंदमविरोधात भाजपकडून प्रदीप परदेशी रिंगणात होते. पण परदेशी यांचा अर्ज बाद झाल्याने आता छिंदमविरोधात भाजपचा उमेदवारच नसेल. त्यामुळे अर्थात याचा फायदा छिंदमला होणार आहे. यावरुनच नगरच्या राजकारणात आता चर्चांना उधाण आले आहे.
गेल्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर जिंकून आलेल्या छिंदमला भाजपने उपमहापौर केले. श्रीपाद छिंदम हा भाजप खासदार दिलीप गांधी आणि माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांचा समर्थक आहे. त्यामुळे छिंदमविरोधातील भाजप उमेदवाराचा अर्ज बाद होणं, हे प्रक्रियेनुसार झालंय की यामागे राजकीय षड्यंत्र आहे? अशी चर्चा आता नगरमध्ये सुरु झाली आहे.
श्रीपाद छिंदम हा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत अश्लिल शब्द वापरुन आक्षेपार्ह बरळला होता. त्यावेळी सर्वच स्तरातून छिंदमवर टीका झाली. शिवप्रेमींनी छिंदमला चोपही दिला होता. सुरक्षेसाठी नगरमधून छिंदमला बाहेर हलवण्यात आले होते. मात्र, काही दिवस लोटल्यानंतर छिंदम पुन्हा राजकारणात सक्रीय होऊ पाहत आहे आणि त्याला भाजप पाठिंबा देत आहे की काय, अशी शंका नगरमध्ये घेतली जात आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह बरळल्यानंतरही श्रीपाद छिंदम याला निवडणुकीच्या रिंगणात उतरु दिले जाते आहे, याबद्दल शिवप्रेमींकडून रोष व्यक्त केला जात आहे.