योगेश बोरसे, पुणे : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मागील काही दिवसांमध्ये महापुरुषांबद्दल अवमान करणारे विधान केल्याने राज्यभर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात आंदोलन केले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यपाल हटाव ही मोहीम ठिकठिकाणी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे पुणे दौऱ्यावर असतांना छत्रपती संभाजीराजे यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यपालांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली आहे. कार्यक्रम उधळून लावण्यासाठी गेलेल्या स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते डॉ. धनंजय जाधव यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. छत्रपती शिवाजी महाराज व महापुरुषांच्या बाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या संदर्भात राज्यपालांचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. यामध्ये ‘राज्यपाल हटवा, अस्मिता वाचवा’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देत राज्यपालांचा निषेध करण्यात आला.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत स्वराज्य संघटनेच्या वतिने राज्यपाल यांचा निषेध करण्यात आला.
यावेळी स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते डॉ. धनंजय जाधव यांनी राज्यपाल यांना महाराष्ट्रातून जो पर्यन्त बाहेर काढत नाही तोपर्यन्त आम्ही शांत बसणार नाही असा इशारा दिला आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरुन राजकीय नेत्यांपासून विविध संघटनांनी आक्रमक भूमिका घेत लक्ष वेधून घेणारी आंदोलन केली आहे.
राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांसह अनेक शिवभक्तांनी राष्ट्रपतींना पत्र पाठवून भगतसिंग कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून पदमुक्त करा अशी विनंती केली आहे.
एकूणच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात राज्यातील वातावरण अधिकच तापले असून येत्या काळात हा विरोध कुठपर्यंत जातो हे बघणं ही महत्वाचे ठरणार आहे.