मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिके(BMC)च्या वतीनं, कोविड-१९ विषाणूच्या जनुकीय सूत्राचं निर्धारण (नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेंसिंग-next gen genome sequencing) करणाऱ्या चाचण्या नियमितपणे केल्या जात आहेत. या अंतर्गत पाचव्या तुकडीमध्ये मुंबईतील २२१ रुग्णांमधील कोविड विषाणू नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला असून त्याचे निष्कर्ष जाहीर करण्यात आलेत. यात ‘डेल्टा व्हेरिएंट’चे ११ टक्के तर ‘डेल्टा डेरिव्हेटिव्ह’चे ८९ टक्के रुग्ण आढळलेत. तसेच, ओमिक्रॉन (Omicron) या नवीन प्रकाराचे फक्त २ रुग्ण (संकलित नमुन्यांच्या संख्येत १ टक्क्यांपेक्षाही कमी) आढळले असून तेही यापूर्वीच जाहीर केलेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, नमुने संकलित केलेल्या २२१ पैकी एकाही बाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
कोविड लसीकरण आवश्यक
चाचणीचे सर्वंकष निष्कर्ष पाहता, कोविड लसीकरण वेगानं केल्याचा प्रभाव म्हणून मुंबई महानगरातील कोविडची साथ पूर्णपणे नियंत्रणात असल्याचं स्पष्ट होतंय. असं असलं, तरी नवीन ओमिक्रॉन विषाणू प्रकाराचा वेगानं प्रसार होण्याचा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेला इशारा लक्षात घेता, सर्वांनी मास्कचा उपयोग, सुरक्षित अंतर राखणं, हातांची स्वच्छता आदी नियमांचं पालन यापुढेही कठोरपणे करणं आवश्यक आहे. सर्व पात्र नागरिकांनी कोविड लसीकरण पूर्ण करून घेणं हेदेखील आवश्यक आहे.
दोन किंवा अधिक प्रजातींमधील ओळखता येतो फरक
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी (Suresh Kakani) यांच्या निर्देशानुसार, कोविड विषाणू जनुकीय सूत्र निर्धारण चाचणी उपक्रम नियमितपणे राबविण्यात येत आहे. विषाणूंचं जनुकीय सूत्र निर्धारण केल्यानं, एकाच विषाणूच्या दोन किंवा अधिक प्रजातींमधील नेमका फरक ओळखता येतो. असा फरक ओळखू आल्यानंतर उपचार पद्धतीची नेमकी दिशा स्पष्ट होते. कोविड विषाणूचे नवनवीन प्रकार अद्यापही समोर येतायत. अशा स्थितीत जीनोम सिक्वेसिंग लॅबमध्ये वैद्यकीय नमुन्यांची तपासणी करून उपचारांना वेग देणं महानगरपालिका आरोग्य प्रशासनाला शक्य झालं आहे.
२२१ नमुन्यांसंदर्भातले निष्कर्ष
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात स्थित नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग लॅब व पुणे स्थित राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं या पाचव्या चाचणी तुकडीचा (बॅच) भाग म्हणून कोविड बाधा झालेल्या एकूण २७७ रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यातील २२१ रुग्ण हे मुंबई महानगरातील नागरिक आहेत. त्यामुळे या २२१ नमुन्यांसंदर्भातले निष्कर्ष देण्यात येतायत.
कोणत्या वयोगटात किती रुग्ण?
मुंबईतील २२१ रुग्णांपैकी १९ रुग्ण (९ टक्के) हे ० ते २० वर्षे आतील वयोगटातले आहेत. २१ ते ४० वर्षे वयोगटात ६९ रुग्ण (३१ टक्के), ४१ ते ६० वर्षे वयोगटात ७३ रूग्ण (३३ टक्के), ६१ ते ८० वयोगटात ५४ रुग्ण (२५ टक्के) आणि ८१ ते १०० वयोगटातील ६ रुग्ण (३ टक्के) यामध्ये समाविष्ट आहेत.
एक टक्क्यापेक्षाही कमी प्रमाण
चाचणीतील निष्कर्षानुसार, २२१ पैकी २४ रुग्ण (११ टक्के) हे ‘डेल्टा व्हेरिएंट’ तर १९५ रुग्ण (८९ टक्के) हे ‘डेल्टा डेरिव्हेटिव्ह’ प्रकारातले कोविड विषाणूनं बाधित असल्याचं स्पष्ट झालं आहे. तर उर्वरित दोघं ओमिक्रॉन या नवीन प्रकारच्या विषाणूनं बाधित असल्याचं निदर्शनास आलं आहे. एकूण संकलित नमुन्यांच्या संख्येच्या तुलनेत त्याचं प्रमाण एक टक्क्यापेक्षाही कमी आहे.
महापालिकेकडून दक्षता
मुंबईत दोन ओमिक्रॉन बाधित असल्याचं यापूर्वीच जाहीर केलं असून तेच हे रुग्ण आहेत, त्यात वाढ नाही. या ओमिक्रॉन बाधितांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. तसेच त्यांच्या निकटवर्तीयांचीदेखील कोविड चाचणी केली असता त्यात कोणालाही कोविड बाधा झालेली नसल्याचं स्पष्ट झालं आहे. महानगरपालिका प्रशासन सर्वतोपरी दक्षता घेत आहे. असं असलं, तरी ओमिक्रॉन विषाणू अत्यंत वेगानं प्रसारित होणारा असल्यानं नागरिकांनीदेखील गाफील न राहता कोविड प्रतिबंधक वर्तन कायम ठेवले पाहिजे.
गंभीर धोका नाही
डेल्टा व्हेरिअंट आणि डेल्टा डेरिव्हेटिव्ह या दोन्ही प्रकारातील कोविड विषाणू तुलनेनं सौम्य त्रासदायक असून त्यापासून तितकासा गंभीर धोका संभवत नाही. डेल्टा व्हेरिअंट समवेत तुलना केल्यास, डेल्टा डेरिव्हेटिव्ह विषाणू संक्रमण, प्रसार वेगदेखील कमी असल्याचं आढळलं आहे. त्यामुळे कोविड बाधा निष्पन्न झाल्यानंतर वेळीच व योग्य वैद्यकीय उपचार घेणं आवश्यक आहे.
मृत्यूदर कमी
चाचणी निष्कर्षातली महत्त्वाची बाब, म्हणजे कोविड लसीकरण हा निकष विचारात घेतल्यास, या २२१पैकी पहिला डोस घेतलेल्या फक्त एका रुग्णाला तर दोन्ही डोस घेतलेल्या अवघ्या २६ जणांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. लसीचा एकही डोस न घेतलेल्या ४७ पैकी १२ जणांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. सुदैवानं, या २२१ पैकी कोणाही बाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही, ही सर्वाधिक दिलासादायक बाब आहे.
लस आवश्यक
लस घेणाऱ्यांना व कोविड प्रतिबंधक नियम पाळणाऱ्यांना विषाणू बाधेपासून सर्वाधिक संरक्षण मिळतं तसेच बाधा झाली तरी त्याची तीव्रता पूर्णपणे रोखता येते. तर लस न घेतलेल्यांना कोविड बाधेपासून तीव्र धोका संभवतो, हा वैद्यकीय इशारा लक्षात घेता सर्व पात्र नागरिकांनी कोविड लसीचे दोन्ही डोस घेवून लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करून घेणं आवश्यकच आहे.
प्रसार नियंत्रणात
एकूण २२१ रुग्णांपैकी, वय वर्ष १८ पेक्षा कमी असलेल्या वयोगटामध्ये १३ जण मोडतात. पैकी २ जणांना ‘डेल्टा व्हेरिएंट’ आणि ११ जणांना ‘डेल्टा डेरिव्हेटिव्ह’ प्रकाराची कोविड लागण झाल्याचं आढळलं. याचाच अर्थ, तुलनेनं बालक व लहान मुलांना कोविडची बाधा होण्याचं प्रमाण संपूर्णपणे नियंत्रणात आहे.
जीनोम सिक्वेसिंग संयंत्र उपलब्ध
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात विषाणुंचे जनुकीय सूत्र निर्धारण वैद्यकीय प्रयोगशाळा (नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग लॅब) स्थापन करण्यात आलीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दिनांक ४ ऑगस्ट २०२१ला त्याचं लोकार्पण करण्यात आलं. यानंतर सदर यंत्रणा वैद्यकीय दृष्ट्या प्रमाणित (validation) होवून कार्यान्वित करण्यात आली. या वैद्यकीय प्रयोगशाळेमध्ये जनुकीय सूत्र निर्धारण करू शकणारे दोन संयंत्र उपलब्ध आहेत. अमेरिकेतील इलुम्निया या कंपनीनं, अमेरिकेतीलच अल्ब्राईट स्टोनब्रिज ग्रुप (ए. एस. जी. – बोस्टन) या संस्थेच्या माध्यमातून एकूण ६ कोटी ४० लाख रुपये किंमतीचे हे २ जीनोम सिक्वेसिंग संयंत्र बृहन्मुंबई महानगरपालिकेला दान स्वरुपात दिले आहेत.
२३ ऑगस्ट २०२१ रोजी सर्वप्रथम चाचणी
जनुकीय सूत्राचे निर्धारण (नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग) करणाऱ्या वैद्यकीय यंत्रणेच्या माध्यमातून सर्वप्रथम दिनांक २३ ऑगस्ट २०२१ रोजी चाचणी करण्यात आली. त्यानंतर दिनांक २१ सप्टेंबर २०२१ रोजी दुसऱ्यांदा, दिनांक ११ ऑक्टोबर २०२१ रोजी तिसऱ्यांदा तर दिनांक ९ नोव्हेंबर २०२१ रोजी चौथ्यांदा कोविड नमुन्यांची चाचणी करण्यात आली होती.
काळजी घेण्याचं आवाहन
सर्व पात्र नागरिकांनी कोविड लसीचे दोन्ही डोस घ्यावेत. विशेषतः पहिला डोस घेतलेल्यांनी न चुकता दुसरा डोसदेखील घ्यावा. सर्वांनी मास्कचा योग्य उपयोग करावा. सार्वजनिक स्थळी सुरक्षित अंतर राखावे. गर्दी टाळावी. हातांची नियमित स्वच्छता राखावी. या सर्व बाबी प्रत्येकानं कटाक्षानं पाळाव्यात, असं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलंय.