महेंद्रकुमार मुधोळकर बीड | 9 नोव्हेंबर 2023 : राज्यातील ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले. अनेक युवकांनी प्रस्थापितांना धक्का देत विजय मिळवला. राज्यातील प्रमुख सहा पक्षांमध्ये भाजप, अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी वर्चस्व मिळवले. शरद पवार यांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेसला मोठे यश मिळाले नाही. विदर्भ आणि मराठवाड्यात तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाने एन्ट्री मिळवली. या निवडणुकीची ते वैशिष्ट्य राहिले. बीड जिल्ह्यातील निवडणूक अधिक चर्चेतील राहिली. गेवराई तालुक्यातील रेवकी या ग्रामपंचायतीच्या निकालाची चर्चा सर्वत्र होत आहे. कारण एकाच कुटुंबातील तीन जण अन् तीन पक्ष अशी परिस्थिती होती.
बीड जिल्ह्यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची सरशी पाहायला मिळाली. तर भाजपा हा दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. गेवराई तालुक्यामध्ये 32 ग्रामपंचायतीचे निकालात रेवकी ग्रामपंचायत वेगळी ठरली. या ठिकाणी माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी वर्चस्व कायम राखले आहे. रेवकी ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे वर्चस्व बीआरएसने मोडून काढले. या ठिकाणी सर्वच्या सर्व नऊ जागा बीआरएसने जिंकल्या. तसेच शशिकला भगवान मस्के सरपंच पदाच्या उमेदवार विजयी झाल्या आहेत.
बाळासाहेब मस्के हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक राष्ट्रवादीत होते. त्यांची पत्नी मयुरी मस्के या भारतीय जनता पक्षात सक्रीय होत्या. या दोघांनी एकत्र येत गावात तिसरा पर्याय निर्माण केला. त्यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला. त्यातून मयुरी मस्के यांच्या सासू शशिकला मस्के यांना सरपंच पदासाठी उमेदवारी मिळाली. त्या निवडून आल्या आहेत. या आगळ्यावेगळ्या राजकीय समीकरणातून झालेल्या विजयाची सध्या चांगलीच चर्चा होते आहे. बीआरएसने मराठवाडा आणि विदर्भात चांगले यश मिळवले. यामुळे ग्रामीण भागात त्यांची पायमुळे भक्कम होत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील विधानसभेत बीआरएस पक्षाचा प्रवेश झाला तर आश्चर्य वाटणार नाही. तसेच राज्यातील पक्षांसाठी बीआरएस धोक्याची घंटा ठरणार आहे.